कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक ते संभाजीनगरसारख्या ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यस्था ढासळली आहे. मुंबई, ठाण्यात दिवसा डान्सबार सुरू असून अवैध धंदे करणाऱया गुन्हेगारांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केली. दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाजमंत्री, राज्यमंत्री यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले. त्यामुळे सभागृह दोनवेळा तहकूब करावे लागले.

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱयांचे व आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका दानवे यांनी केली. सरकार आश्वासन देते, मोठमोठय़ा घोषणा करत आहे. मात्र पुढे जात नाही, असा टोला दानवे यांनी लगावला. राज्यातील आरोग्य व्यवस्थाही ढिसाळ झाली आहे. त्यामुळे दररोज लोकांचे बळी जात आहेत. याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अदानीसाठी बेकायदेशीर व्यवहार

कोकणात अदानी कंपनीला जमीन देण्यासाठी बेकायदेशीररीत्या जमिनीची खरेदी-विक्री सुरू आहे. संगमनेर येथे बोगस व्यवहार सुरू असून मूळ मालकाची परवानगी न घेता हे व्यवहार केले जातात. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. विरोधकांवर ईडी सीबीआयची चौकशी लागते. हे सरकार अदानीसाठी काम करते की सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, असा सवाल करत या प्रकरणातही तपास झाला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

ठाण्यात भ्रष्ट अधिकारी उजळ माथ्याने वावरतात

संभाजीनगरमधील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीची चौकशी लागते. मात्र, राज्य सरकार या प्रकरणी गप्प का, असा सवाल दानवे यांनी केला. ठाणे महानगरपालिकेत काय चालते याचे पत्र भाजपच्या आमदारने दिले. महेश आहेर या भ्रष्ट अधिकाऱयाने प्रकल्पग्रस्तांची घरे त्यांना न देता दुसऱयाच व्यक्तींनी विकली. असे अधिकारी ठाण्यात उजळ माथ्याने फिरत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.