अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे 42 डॉक्टर मुंबईच्या मदतीला दाखल

458

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्णांना सेवा देण्यात मुंबई येथील डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील 42 डॉक्टरांचे एक पथक 30 मे च्या मध्यरात्री अंबाजोगाई येथून मुंबईला रवाना झालं आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील ही 42 निवासी डॉक्टरांची टीम 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईत दाखल झाली आहे. ही टीम पुढचे 15 दिवस सेव्हन हिल रुग्णालयात कोविड रुग्णांना सेवा देणार आहे. मार्चपासून मुंबईत मार्डचे निवास डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, सिपीएस डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टर जीवाची बाजी लावत काम करत आहेत. काही डॉक्टर कोरोनाग्रस्तही होत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होत आहेत. पण त्याचवेळी रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने आता डॉक्टर-नर्सेस कमी पडू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने केरळकडे 50 डॉक्टर आणि 100 नर्स स्टाफची मागणी केली होती. यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालकाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर व परिचारीकांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील 42 निवासी डॉक्टरांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातुन मुंबई येथे कोविड रुग्णसेवेसाठी गेलेल्या या 42 निवासी डॉक्टरांच्या या टीममध्ये 16 विद्यार्थीनीही आहेत. या टीमच्या राहण्याची व्यवस्था ललित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या वेळी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी “मुंबईतील आमचे मार्डचे डॉक्टर आणि इतर डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत ते काम करत असून त्यांच्यावर खूप मोठा ताण पडला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही मुंबई येथे रुग्णसेवा देण्यासाठी चाललो आहोत. अशा परिस्थितीत काम करणे, रुग्णसेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही हे कर्तव्य पार पाडत आहोत” अशी प्रतिक्रिया दिली.

निवासी डॉक्टरांचा उत्स्फुर्त सहभाग…
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णसेवेसाठी मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर डॉक्टर पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यापैकी 12 निवासी वैद्यकीय मुलींनी स्वतः अर्ज देऊन मुंबई येथे रुग्ण सेवेसाठी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. या टीममध्ये सहभागी झालेल्या 42 निवासी डॉक्टरांना सर्व प्रकारची दक्षता घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या