अभिमानास्पद! अंबाजोगाईची कन्या डॉ. नूतन जोशी देशात प्रथम

अंबाजोगाई येथील रहिवासी व मुंबई येथे कोविड रुग्णांची सेवा करणारी डॉ. नूतन जोशी हिने वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. आज कोविड युद्धात संपूर्ण जग भरडलं जात आहे. या आधुनिक युद्धभूमीवर अनेक डॉक्टर योद्धे आपलं जिवाचं रान करून लढत आहेत. अंबाजोगाईच्या कन्या व लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असलेल्या कोविड योद्धा डॉ. नूतन जोशी यांनी महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली जाईल अशी कामगिरी केली आहे.

15 सप्टेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील हेमॅटॉलॉजी सुपर स्पेशालिटी परीक्षेत (Hematology Superspeciality Exam) मध्ये अंबाजोगाईची कन्या डॉ. नूतन जोशी यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला. नामांकित मुंबईच्या सायन वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी गुणवत्तेत पूर्ण केली. त्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रशिक्षण घेताना एम.डी. मेडिसीनच्या अंतिम परीक्षेत राज्यात बारावा क्रमांक मिळविला. त्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रशिक्षण घेण्यासाठी तिने राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश पात्रता परीक्षा दिली. त्यात तिने देशात प्रथम क्रमांक पटकावला. ही परीक्षा तिने कोविड काळात मुंबई येथील सेव्हन हिल्स हॉस्पीटलमध्ये कार्यरत असताना व डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना दिली. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

तिचे दहावी पर्यंतचं शिक्षण येथील योगेश्वरी कन्या शाळेत झाले. शालेय जीवनापासून ते वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात तिने आग्रक्रम ठेवला. हे करीत असतानाच तिला काव्य रचना करण्याचा देखील छंद आहे. अनेक समाजोपयोगी कामात त्यांनी हातभार लावला आहे. सर्वगुणसंपन्न डॉ. नूतन जोशी यांना संपूर्ण अंबाजोगाईकरातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या