आता यू टर्न नाही; सीएसकेतील खास खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

चेन्नई सुपरकिंग्जमधील महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल मॅच असल्याच्या शक्यतेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने त्याचे फॅन्स आले आहेत. धोनी या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करेल का, याबाबत चर्चा सुरू आहेत. त्याच्या निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट नसताना सीएसकेतील महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळेस यू टर्न घेणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

रायुडूने यापूर्वी दोन वेळा निवृत्ती जाहीर करून नंतर माघार घेतली होती. मात्र, आता तो शेवटचा आयपीएल सामना खेळणार आहे. 38 वर्षांच्या रायुडूने ट्विट केले की, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन ग्रेट संघांसोबत, 14 हंगामात 204 सामने, 11 प्ले ऑफ, 8 फायनल अन् 5 ट्रॉफी… आशा करतो की आज सहावी जिंकू.. हा प्रवास अविस्मरणीय होता. आजच्या फायनलनंतर मी आयपीएल खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत खेळण्याचा मी मनसोक्त आनंद घेतला. सर्वांचे आभार,, यावेळी यू टर्न नाही…

चेन्नई सुपर किंग्सने 6.75 कोटींत रायुडूला आपल्या ताफ्यात घेतले होते. 2002मध्ये 16 वर्षांचा असताना त्याने इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 177 धावांची खेळी केली होती. 2011मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. 2014 मध्ये त्याला MI ने पुन्हा संघात घेतले. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आला. त्याने एकूण 203 सामन्यांत 4329 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 22 अर्धशतकांचा समावेश आहे. 2018च्या पर्वात त्याने 16 सामन्यांत 43च्या सरासरीने 600 धावा फटकावत CSKच्या जेतेपदात मोठा वाटा उचलला होता.