व्हेल माशाची उलटी विकायचा प्रयत्न फसला, दोन कोटी 70 लाखांच्या उलटीसह तिघांना पकडले

व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्री करणे बेकायदेशीर असतानाही कोटय़वधी किमतीची व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने शिताफीने पकडले. त्या तिघांकडून तब्बल दोन कोटी  70 लाख रुपये किमतीची उलटी जप्त करण्यात आली. चौथा आरोपी वॉण्टेड असून त्याला पकडल्यानंतर ही उलटी कुठून आणली याची माहिती मिळेल असे सांगण्यात येते.

उच्च प्रतीचा परफ्यूम, औषधे, सिगारेट, मद्य,  तसेच खाद्यपदार्थांमध्ये वापर होणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीला बाजारात मोठी पिंमत असते. त्यामुळे ही उलटी विनापरवाना खरेदी-विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र तरीदेखील तीन इसम व्हेल माशाची उलटी विकण्याच्या तयारीत असून ते मुलुंड येथे येणार असल्याची खबर युनिट-4 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बोलमवाड, एपीआय राजेश पाटील, अजय बिराजदार तसेच साळुंखे, अजय बल्लाळ, जगताप, चव्हाण आदींच्या पथकाने वन विभागाच्या पथकासह मुलुंड पश्चिमेकडील सालपादेवी पाडा येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार तिघे तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या ताब्यात दोन कोटी 70 लाख किमतीची व दोन हजार 700 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी मिळाली. आरोपींनी ही उलटी गुजरात येथून त्यांच्या चौथ्या साथीदारामार्फत आणली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी गुजरातचा असून दोघे मुंबईचे राहणारे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या