अंबरनाथ आर्ट फेस्टिवलचे दणक्यात उदघाटन

32

सामना ऑनलाईन, अंबरनाथ

९५६ वर्ष पुरातन हेमाडपंती शिवमंदिराच्या साक्षीने अंबरनाथ शहराच्या कलेचा समृद्ध वारसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या अंबरनाथ आर्ट फेस्टिवलचे उदघाटन शुक्रवारी संध्याकाळी दणक्यात पार पडले. शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे आयोजक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या या महोत्सवात ’ न भूतो न भविष्यती’ अशी संगीत मेजवानी अंबरनाथकरांनी अनुभवली. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि राहुल देशपांडे यांच्या रमणीय संगीताच्या अनोख्या मैफिलीने शिवमंदिर परिसरातील वातावरण जादुई झाले. त्यांना बेला शेंडे यांनी समर्थ साथ दिली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक ओजस आधिया यांनी आपल्या बहारदार कलेने अंबरनाथकरांची मने जिंकली. अंबरनाथ आर्ट फेस्टिवलच्या उदघाटनप्रसंगी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख तसेच, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाप्रेमी अंबरनाथकर मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

महोत्सवाचे वैशिष्ट्य

या महोत्सवाच्या निमित्ताने जे जे आर्ट्सच्या मुलांनी ठिकठिकाणी केलेले वॉलपेंटिंग्सने अवघ्या शिवमंदिर परिसराचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अनेक आकर्षक मिनीएचर्स, प्रवेशद्वारावरील शिवाचे वालुका शिल्प अंबरनाथकरांचे लक्ष वेधून घेत होते. अच्युत पालव यांची कॅलिग्राफी, आर्ट गॅलरीमधील आकर्षक चित्रे यांनी आबालवृद्धांना वेड लावले. लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ऍडव्हेंचर पार्कमध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद लहान मुलांनी लुटला.

 

आपली प्रतिक्रिया द्या