एअर इंडियाच्या विमानांना अमेरिकेत प्रवेशबंदी; 22 जुलैपर्यंत उड्डाणास मनाई

2472

जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली असून कोरोना संक्रमित देशांतून येणाऱ्या प्रवाशांनाही मनाई केली आहे. कोरोनामुळे वेगवेगळ्या देशात अडकलेल्या हिंदुस्थानींना परत मायदेशी आण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भरत मिशन सुरू केले आहे. या मोहिमे अंतर्गत विवध देशांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना परत आणण्यासाठी विशेष विमाने पाठवण्यात येत आहेत. मात्र, अमेरिकेने या मोहिमेला खोडा घातला असून मोहिमे अंतर्गत या विमानांना त्यांच्या देशात प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

हिंदुस्थानने विमान वाहतुकीशी संबंधित करार मोडल्याचे सांगत अमेरिकेने या मोहिमेतंर्गत विमानांना प्रवेश नाकारला आहे. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अद्याप आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिलेली नाही. मात्र, परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानींना वंदे भारत मोहिमे अंतर्गत परदेशातून परत आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमाने चालवली जात आहेत. असे असताना अमेरिकेच्या विमान कंपन्यांच्या विमानांना हिंदुस्थान-अमेरिका मार्गावर परिचालन करण्यास हिंदुस्थान सरकारने परवानगी दिलेली नाही, हा भेदवभाव असल्याचे अमेरिकेनं म्हटले आहे. अमेरिकेच्या डीओटी विभागाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.

सद्यस्थिती पाहता एअर इंडियाच्या कोणत्याही विमानाला हिंदुस्थान-अमेरिका या मार्गावर उड्डाणासाठी 22 जुलैपर्यंत मंजुरी देण्यात येणार नाही. तसेच जोपर्यंत विशेषरित्या विभागाकडून याला मंजूरी मिळत नाही, तोवर त्यांना उड्डाण करता येणार नाही,असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदुस्थान सरकारने अमेरिकन विमानांच्या परिचालन अधिकारात अडथळा आणला आहे. अमेरिकन विमान कंपन्यांसोबत भेदभाव करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे डीओटीने म्हटले आहे. परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानींना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत हे मिशन सुरू करण्यात आले आहे. . एअर इंडियाने 18 मे पासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकेने एएर इंडियाच्या विमानांना मज्जाव करत या मोहिमेलाच खोडा घातला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या