‘कोल्ड वॉर’ – अमेरिकेला साथ देऊ नका, परिणाम भयानक होतील; चीनची हिंदुस्थानला धमकी

13727

अमेरिका आणि चीन यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले आहे. कोरोना विषाणू चीनने जाणूनबुजून पसरू दिला असा अमेरिकेचा आरोप आहे. अशातच चीनने हिंदुस्थानची कुरापत काढत लडाखमध्ये मोठा सैन्य हालचाली सुरू केल्या. यामुळे दोन्ही देशात गेल्या महिनाभरापासून तणाव आहेत. या दरम्यान अमेरिकेने हिंदुस्थानची बाजू घेतली. हिंदुस्थान आणि अमेरिका यांचे चांगले संबंध चीनच्या बारीक डोळ्यांना खुपत आहेत.

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या कोल्ड वॉरपासून हिंदुस्थानने लांब रहावे. हिंदुस्थानने अमेरिकेला साथ देण्याचा प्रयत्न करू नये आणि या वादापासून लांब रहावे. अन्यथा याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी चीनने हिंदुस्थानला दिली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने यावर भाष्य केले आहे.

चीनविरोधात उठणाऱ्या आवाजाला आळा घाला
हिंदुस्थानमध्ये राष्ट्रवादी भावना वेगाने वाढत असून अमेरिका आणि चीन यांच्यातील कोल्ड वॉरचा फायदा उठवण्यासाठी सरकारला बळ देत आहे. हिंदुस्थान जर यात पडला तर कोरोना विषाणूच्या मध्यातच हिंदुस्थानला मोठ्या आर्थिक आघाडीवर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल, असा धमकी वजा इशारा चीनने दिला. हिंदुस्थानने अशा स्थितीत अमेरिकेसोबत हातमिळवणी करून चीनविरोधात पाऊल उचलल्यास याचे परिणाम भयानक होतील. तसेच हिंदुस्थानला आपल्या देशात चीनविरोधात उठणाऱ्या आवाजाला आळा घालण्याची गरज आहे, असेही चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हटले.

…तर मोठे नुकसान सोसावे लागेल
दोन्ही देशात सुरू असलेल्या वादात अमेरिकेशी हातमिळवणी करण्यापासून हिंदुस्थानला सावधान राहण्याची गरज आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थतेची बतावणी अनावश्यक आहे. चीन आणि हिंदुस्थानकडे आपल्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे, यात तिसऱ्या कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, असेही ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले. यासह हिंदुस्थानने अमेरिकेच्या हातचा बाहुला होऊ नये. असे झाल्यास दोन्ही देशांच्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना झटका बसेल. यामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था संकटात सापडेल असा इशारा चीनने दिला.

आपली प्रतिक्रिया द्या