अमेरिकेने WHO सोबतचे सगळे संबंध तोडून टाकले

2081

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी अमेरिकेकडून या संघटनेला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. ही आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले बनली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना ही सपशेल अपयशी ठरली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.  ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये बोलताना ते म्हणाले की ‘आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला व्यापक प्रमाणावर सुधार करण्याची विनंती केली होती, मात्र असं करण्यात ते अपयशी ठरले. आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले नाते तोडत आहोत. ही संघटना पूर्णपणे चीनच्या ताब्यात गेली असून चीन हा अमेरिकेच्या तुलनेत या संघटनेला तुटपुंजा निधी देतो.’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेला इशारा दिला होता. 30 दिवसांत जर या आरोग्य संघटनेने सुधार केले नाही तर अमेरिकेकडून त्यांना मिळणारा निधी पूर्णपणे बंद करण्यात येईल असं ट्रम्प म्हणाले होते. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या चुकांची किंमत आज संपूर्ण जग भोगत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी आरोग्य संघटनेला पत्र देखील लिहिले होते. यामध्ये त्यांनी चीनच्या कचाट्यातून तुम्हाला मुक्त व्हावे लागेल असा इशारा दिला होता.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरही सडकून टीका केली आहे. चीनने केलेल्या अपराधाची शिक्षा संपूर्ण जग भोगत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनने या जागतिक महामारीला सुरुवात केली, ज्यामुळे अमेरिकेला 1 लाखाहून अदिक नागरिकांचे जीव गमावून त्याची किंमत भोगावी लागली आहे. ट्रम्प म्हणाले की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला काही सुधारणा कराव्यात असा इशारा दिला होता. मात्र त्यांनी तो मानला नाही आणि सुधारणा करण्यात ते अपयशी ठरले. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजारासंदर्भात आरोग्य संघटना आणि चीन या दोघांनी संपूर्ण जगाची दीशाभूल केल्याचाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ते म्हणाले की जेव्हा हा विषाणू चीनमध्ये पहिल्यांदा सापडला तेव्हा त्याबाबतची माहिती लपवण्यात आली. चीनने याबाबतीमध्ये कधीच पारदर्शकता राखली नाही. चीन जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी  4 कोटी डॉलर्सचा निधी देतो मात्र अमेरिका 45 कोटी डॉलर्सचा निधी देते असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या