चांगली बातमी – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या ‘अँटिबॉडी’ पासून औषध तयार करण्यात यश

6189

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या जगासाठी अमेरिकेतून चांगली बातमी आली आहे. अमेरिकेची एली लिली कंपनीने (Eli Lilly and Company) कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या ‘अँटिबॉडी’ पासून औषध तयार करण्यास यश मिळाल्याचा दावा केला आहे. या औषधाची मानवी चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तापासून तयार केलेल्या औषधाचा डोज देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या जगाला दिलासा मिळणार आहे.

कंपनीने बनवलेल्या या औषधाचे नाव ‘LY-CoV555’ असे ठेवले आहे. लिली आणि सेल्लेरो बायोलॉजी कंपनीने मिळून हे औषध तयार केले आहे. याआधी मार्च महिन्यात लिली कंपनीने सेल्लेरो बायोलॉजी कंपनीसोबत कोरोना विषाणूवर औषध तयार करण्यासाठी करार केला होता. आता कंपनीने औषध तयार केल्याचा दावा केला असून पहिल्या टप्प्यात औषध किती सुरक्षित आहे आणि रुग्णाची सहन क्षमता याची माहिती मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.

रुग्णांवर याची चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरच बाजारात हे औषध उतरवले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे कंपनीने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तापासून तीन महिन्यात हे औषध तयार केले आहे. LY-CoV555 हे पहिले असे औषध असणार असून जे खासकरून कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी तयार केले गेले आगे. या औषधाद्वारे कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीन संरचनेला निष्क्रिय केले जाईल, असे कंपनीने सांगितले.

दरम्यान, जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 65 लाखांहून अधिक झाला असून 3 लाख 88 हजारांहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेला या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला असून येथे 1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानमध्येही रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या पार केला असून मृतांचा आकडा 6 हजार जवळ पोहोचला आहे

आपली प्रतिक्रिया द्या