अमेरिकेत मृतदेहांचा खच, 3 दिवसात 6 हजार मृत्यू; अडीच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीती

4151

जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत जवळपास 1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेननंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले असून मृतांचा आकडा 15 हजारांवर गेला आहे. गेल्या 3 दिवसात जवळपास 6 हजार लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत साडेचार लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून न्यूयॉर्कमधील परिस्थिती बिकट होत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 1887 लोकांनी जीव गमावला असून एकट्या न्यूयॉर्कमध्ये 780 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कोरोनाचा मृत्यूदर साडे तीन टक्क्यांवर पोहोचला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ताज्या अहवालानुसार मृत्यूचे प्रमाण असेच राहिले तर चार महिन्यांत 6प हजारांहून जास्त मृत्यू होण्याचीही भीती आहे. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वीच कोराेनामुळे किमान 1 लाख ते अडीच लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली होती.

न्यूयॉर्क राज्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोन तृतीयांशाहून जास्त मृत न्यूयॉर्कचे आहेत. येथील रुग्णालयांत आता रुग्ण ठेवायला जागाही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे लोकांवर ट्रक व शहरातील किनाऱ्यावर तंबूत उपचार केले जात आहेत. मृतदेहांना बॉडीबॅगमध्ये ठेवून रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये ठेवले जात आहे. तसेच शवागारमध्येही जागा राहिलेली नाही, त्यात दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्नही बिकट होत आहे.

यासह अमेरिकेत लोकांसमोर खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शहरांत चॅरिटी फूड बँकांसमोर कारची लांबच लांब रांग दिसते. एनजीओ बेघर लोकांसाठी अन्नाची व्यवस्था करून देत आहेत. येथे कार्यरत मॅनिंग म्हणाले, गेल्या 16 वर्षांपासून येथे काम करतो. यंदा वादळ तसेच पुरामुळे आलेल्या राष्ट्रीय आपत्तीमध्येही काम केले. परंतु आतापर्यंत कधीही अशी परिस्थिती नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या