ईव्हीएमच्या सत्यतेबद्दल सातत्याने शंका उपस्थित होत असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या जगद्विख्यात कंपन्यांचे सीईओ अॅलन मस्क यांनी ईव्हीएम मानव किंवा एआय तंत्रज्ञानाद्वारे हॅक होऊ शकते, असा दावा केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार केनेडी ज्युनियर यांच्या पोस्टच्या हवाल्याने त्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करूच नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अॅलन मस्क यांनी ‘एक्स’द्वारे केलेल्या पोस्टमध्ये ईव्हीएम हॅक होण्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी केलेली पोस्ट मस्क यांनी रिट्विट केली आहे. केनेडी ज्युनियर यांनीही ईव्हीएम काढून टाकण्याची मागणी केली आहे. केनेडी ज्युनियर यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमिततेबद्दल एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
ज्युनियर केनेडींच्या पोस्टमध्ये काय?
ज्युनियर केनेडी यांनी पोस्टद्वारे प्युर्टो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएमशी निगडित अनियमिततांबद्दल सांगितले आहे. प्युर्टो रिकोच्या निवडणुकीत शेकडो अनियमितता समोर आल्या. सुदैवाने पेपर ट्रेल होता. त्यामुळे गडबड-गोंधळ ओळखता आला आणि मतमोजणीत दुरुस्ती करता आली, परंतु ज्या देशांमध्ये पेपर ट्रेल नाही त्यांचे काय? असा सवालही केनेडी यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या नागरिकांना त्यांचे मत कुणाला गेले आणि त्यात काही गडबड तर झाली नाही ना, हे जाणून घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप टाळण्यासाठी पुन्हा कागदी मतांवर परतावेच लागेल, असेही केनेडी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा डेमोव्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
भाजपने दावा फेटाळला
अॅलन मस्क यांचा दावा भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी फेटाळला. मस्क यांची टिप्पणी वरवरची आहे. याचा अर्थ असा होतो की, कुणीच सुरक्षित हार्डवेअर तयार करू शकत नाही का? मला वाटते हे साफ चुकीचे आहे. मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत खरी ठरत असेल. पण हिंदुस्थानात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. हिंदुस्थानसारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.