अमेरिका हिंदुस्थानींसाठी असुरक्षित

>>जयेश राणे

हिंदुस्थानी नागरिकांवर आक्रमण, वंशभेदावरून शेरेबाजी आदी घटना अमेरिकेत वेगाने वाढीस लागल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कन्सास येथे हिंदुस्थानी अभियंत्याची वंशभेदातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर वंशभेदाचे प्रकरण तेथेच थांबले असे वाटत होते. पण त्या नंतरही वंशभेदाकडे बोट दाखवणाऱया घटना घडतच राहिल्या आणि आजमितीपर्यंत त्यांना पूर्णविराम मिळालेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर स्वदेशातील नागरिकांना सर्वच क्षेत्रांत प्राधान्य मिळवून देण्याच्या सूत्रावर काम करण्यास तातडीने सुरुवात करणार असल्याचे तेथील निवडणुकांत ट्रम्प यांनी सांगितले होते. तेथील जनतेलाही हेच सूत्र पुष्कळ भावल्याने त्यांनीही ट्रम्प यांचीच भरघोस मतांनी निवड केली. स्वदेशाचे सूत्र जनतेच्या गळी उतरवण्यात विद्यमान राष्ट्राध्यक्ष यशस्वी ठरले आहेत. पण तेथील उग्र विचारसरणीच्या जनतेने मात्र ते सूत्र पूर्णतः नकारात्मकपणे घेत हिंदुस्थानींना लक्ष्य बनवत त्यांच्यावर हल्ले करण्यास आरंभ केला आहे. ट्रम्प शासनाने वा खुद्द ट्रम्प यांनी आता आपल्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले तरी त्याचा उपयोग होईल असे वाटत नाही. त्यामुळे तेथील हिंदुस्थानींची सुरक्षा हा आजपर्यंत चिंतेचा नसलेला विषय आज १००टक्के चिंतेचा विषय बनला आहे. तेथील शासन हल्लेखोरांना कसे आणि कुठपर्यंत रोखणार? त्या देशात हिंदुस्थानी सर्वदूर पसरलेले आहेत. आपल्या देशात राहणाऱ्या परकीय नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेणे हे त्या देशाचे दायित्व असते. अमेरिकेला स्वदेशातील नागरिकांची जेवढी काळजी आहे तेवढीच आस्था अमेरिकेच्या यशात सिंहाचा वाटा असणाऱया हिंदुस्थानींविषयी दिसत नाही. स्वदेश सोडून दुसऱ्या देशात कमी पैशांत काम करणाऱ्याना मानसन्मान का द्यायचा? हा संकुचित विचार उग्र विचारांचे समर्थन करणाऱयांच्याविषयी जाणवतो. महत्त्वाचे सूत्र असे की असुरक्षितता निर्माण झाल्यावर हिंदुस्थानी आपसूकच हा देश सोडून जाण्यास सुरुवात करतील. त्यामुळे नव्याने येथे कोणी येणार नाही अशी खेळी असल्याची दाट शक्यता वाटत आहे.

ट्रम्प यांचा स्वदेशीचा विचार अमेरिकेत भविष्यात मोठा संघर्ष निर्माण करण्याचे संकेत आताच देत आहे. या संघर्षावर अमेरिका काय यशस्वी तोडगा काढते याकडे हिंदुस्थानी नागरिकांचे लक्ष असणार आहे. वंशभेदाची ही सल आताची नाही तर ती अमेरिकेतील जनतेच्या मनी खदखदतच होती. त्यास आजमितीस ट्रम्प यांच्या माध्यमातून मोकळीक मिळाली आहे. हिंदुस्थानींच्या मानेवर अमेरिकेत जी टांगती तलवार आहे तीच हिंदुस्थानमध्ये अमेरिकेच्या नागरिकांवर असली असती तर अमेरिकेने राईचा पर्वत करत, थयथयाट करत जगाचे लक्ष स्वतःकडे वेधले असते. अमेरिकेशी व्यावसायिक संबंध असले तरी हिंदुस्थानने अमेरिकेच्या दबावाखाली न राहता तेथील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेविषयी ट्रम्प यांना विचारणा केली पाहिजे. महासत्ता आहे म्हणून हिंदुस्थान त्या देशास वचकून राहत असेल तर वंशभेदाचा वणवा अमेरिकेत पसरल्यास हिंदुस्थानींनाच त्याचा त्रास सोसावा लागणार आहे.
हिंदुस्थानी अभियंत्याची हत्या झाल्यानंतर सहा दिवसांनी तेथील शासनाने झाल्या प्रकाराविषयी तोंड उघडले. यावरून यांची असंवेदनशीलता लक्षात येतेच, शिवाय परदेशी नागरिकांनी येथे राहणे त्यांना मनोमन पसंत नसल्याचे स्पष्ट करते. त्यामुळे त्यांच्या त्या तोंडदेखल्या सहानुभूतीविषयी विश्वास वाटणे शक्यच नाही.‘अतिथी देवो भव’ही जगामध्ये केवळ हिंदुस्थानची संस्कृती आणि सभ्यता आहे ती अमेरिकेसारख्या कोडग्या देशांना अंगीकारणे जमणार नाही. कारण हिंदुस्थानी सभ्यतेची नाळ येथील संस्कृतीशी जोडली गेलेली आहे. विविधतेत एकता असणारा जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा एकमेव देश आहे. त्याबद्दल जगभरामध्ये हिंदुस्थानचे कौतुक केले जाते. येथे येणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत वंशभेदी टिप्पणी करून त्यांना अपमानित केल्याचे ऐकिवात, वाचनात नाही.

स्वदेशीविषयीची निर्णायक भूमिका ट्रम्प वेळोवेळी मांडत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानने अमेरिकेवर व्यावसायिक संधींच्या बाबतीत कितपत अवलंबून राहावे याविषयी चिंतन करून भविष्याचे नियोजन करावे. येथील तज्ञ मंडळी नोकरीसाठी अमेरिकेस प्राधान्य देत आली आहेत. अमेरिकेच्या सध्याच्या व्हिसाच्या कडक निर्बंधांचा गांभीर्याने विचार करता हिंदुस्थानने स्वावलंबनास महत्त्व दिले पाहिजे. या स्वावलंबनातून हिंदुस्थानसाठी सकारात्मक बाबी घडू शकतात. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा कुशलपणे कसा विनियोग करून घ्यायचा याविषयी व्यापक विचार केला तरच.
हिंदुस्थानने अमेरिकेचे रागरंग ओळखून त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याचे मंथन करावे.

आपली प्रतिक्रिया द्या