पोलिसांनी फवारलेला पेपर स्प्रे नाकातोंडात गेला, अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू

1020

अमेरिकेत सध्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या दरम्यान आणखी एका कृष्णवर्णीयाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या माणसाचं नावही योगायोगाने फ्लॉयड असंच आहे. पोलिसांनी फवारलेल्या पेपर स्प्रेमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना न्यूयॉर्क येथील ब्रुकलिन मेट्रोपॉलिटन कारागृहात घडली आहे. या कारागृहात जॅमल फ्लॉयड (35) नावाचा कैदी ऑक्टोबर 2019पासून कैद होता. बुधवारी त्याने त्याच्या तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर अडथळे तयार केले आणि दुसऱ्या बाजूची खिडकी तोडू लागला. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या नाकातोंडावर पेपर स्प्रे (काळ्या मिरीचा स्प्रे) फवारला.

स्प्रे फवारल्यानंतर तो शांत झाला, पण त्याची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. जॅमल याला अस्थमा आणि मधुमेह होता. ही बाब कारागृहातील कर्मचारी आणि अधिकारी यांना माहीत होती, असा आरोप जॅमलच्या आईने केला आहे.

या आधी अमेरिकेच्या मिनिसोटे प्रांतात कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याची पोलिसांनी हत्या केली होती. 26 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेत हिंसाचाराचा भडका उडाला आहे. वॉशिंग्टन, डल्लास, ह्युस्टन, अटलांटा, कॅलिफोर्निया आदी 140 शहरांमध्ये दंगलखोरांनी उत्पात माजवला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी जमावाच्या रोषाला पोलीस बळी पडले. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊससमोर आंदोलन करणारे आंदोलक अत्यंत आक्रमक झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या