सतत मास्क घालणारे कोरोना संक्रमित असतात, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जे लोक सतत मास्क वापरतात, ते कोरोना विषाणूने संक्रमित असतात, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प हे गुरुवारी मियामीमधील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना 26 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका जंगी कार्यक्रमाविषयी विचारणा करण्यात आली. या कार्यक्रमानंतर ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. शिवाय, या कार्यक्रमात सहभागी होणारे अनेक पाहुणे कोरोना संक्रमित झाले होते. या कार्यक्रमात अनेक पाहुण्यांनी मास्क परिधान केले नव्हते. त्याविषयीही ट्रम्प यांना विचारणा करण्यात आली.

त्यावर ट्रम्प म्हणाले की, मला मास्क घालण्याविषयी काहीही तक्रार नाही. पण, मास्क सतत घालून ठेवणारे लोक कोरोना संक्रमित होतात, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकीय संस्थेने पुष्टी दिलेली नाही. अमेरिकेत सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयी ट्रम्प हे सातत्याने वक्तव्य करताना दिसत आहेत. विरोधी उमेदवाराच्या प्रचार अभियानातील कोरोना नियमांचीही त्यांनी खिल्ली उडवली असून ते स्वतः देखील बऱ्याचदा मास्क न घालता वावरत असल्याचं पाहण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या