आभाळमाया – ‘अर्टेमिस-1’ अखेर उडालं!

>> वैश्विक

सप्टेंबर महिन्यापासून ‘अर्टेमिस-1’ हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात असलेल्या ‘केनेडी’ अवकाशयान तळावर तिष्ठत उभं होतं. रोज नवी तारीख यायची. ‘आज उडेल, उद्या उडेल’, पण तारीख पे तारीख करता करता ते उडायला 16 नोव्हेंबरचा दिवस उजाडावा लागला. म्हणूनच 22 सप्टेंबरच्या ‘उडेल तेव्हा खरं’ या लेखात आपण त्याची नुसती माहिती घेऊन थांबलो होतो. त्यानंतर संपूर्ण ऑक्टोबर जाऊन अर्धा नोव्हेंबर संपला तेव्हा कुठे संशोधकांनी वारंवार चाचणी, तपासणी करून ‘अर्टेमिस-1’ या यानाला हिरवा सिग्नल दाखवला. ते दृश्य मी पाहिले, पण पूर्वीही ‘काऊंट डाऊन’ सुरू करण्याच्या काही क्षणच आधी काहीतरी गफलत झाल्याचे लक्षात आल्याने उड्डाण स्थगित झाले होते, परंतु संशोधकांची ही चिकाटी आणि संयम उपयोगी ठरला. 16 नोव्हेंबरला ‘नासा’चे एक महत्त्वाकांक्षी चांद्रयान 1972 नंतर प्रथमच चंद्राकडे झेपावलं. त्याआधी 1969 च्या 20 जुलैला चंद्र पादाक्रांत केल्यानंतर एकामागून एक अशा अनेक चांद्रमोहिमा अमेरिकेने यशस्वी केल्या. त्यातले ‘अपोलो-13’ अयशस्वी ठरले हा भाग वेगळा, पण बारा अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याचा विक्रम एकट्या अमेरिकेचाच.

हिंदुस्थानसह अनेक देशांनी मानवविरहीत चांद्रमोहिमा यशस्वी केल्या. त्यात रशिया आघाडीवर असला तरी चंद्रावरच्या पाण्याचा निश्चित पुरावा आपल्या ‘चांद्रयान-1’ मधून ‘नासा’ने पाठवलेल्या उपकरणाद्वारे मिळाला होता. आपलीही ‘चांद्रयान-2’ ही मोहीम शेवटच्या केवळ काही क्षणांकरिता फसली आणि ‘इस्रो’चे संचालक सिवन यांना रडू कोसळले, मात्र वैज्ञानिक प्रयोगात अपयश ही वेगळ्या प्रकारे ‘जमेची’ बाजू असते. विज्ञानात हिंमत हरून चालत नाही. ‘अर्टेमिस’च्या संशोधकांनी तीच जिद्द दाखवली आणि ते चंद्राकडे निघाले.

अर्टेमिस हे ग्रीक पुराणकथेतील चंद्रदेवता. रॉकेटला तेच नाव देण्यात आले. पूर्वी अमेरिकेच्या चांद्रमोहिमांची रॉकेट ‘अपोलो’ नावाने ओळखली गेली. अर्टेमिस ही या ‘अप्पोलो’ची जुळी बहीण असे ग्रीक पुराणकथा सांगते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे अमेरिकेने चंद्रावर आजवर एकाही महिलेला पाठवलेले नाही. अर्टेमिस नावापासून नवी सुरुवात होते का बघूया. ‘अर्टेमिस-1’ या वाहकाने आता चांगलाच वेग पकडला आहे. ताशी 42 हजार किलोमीटर वेगाने ते चंद्राच्या दिशेने निघाल्यानंतर आपल्यापासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्राजवळ जायला किती वेळ लागेल पाहा. अर्थात ‘अर्टेमिस-1’ वरचे बहुउद्देशीय ‘ओरायन’ हे यान चंद्रावर उतरणार नाही. ते चंद्रपृष्ठापासून ठरावीक अंतरावरून चंद्राचे सर्व बाजूंनी बारकाईने निरीक्षण करणार आहे. चंद्राच्या-पृथ्वीच्या गतींमुळे चंद्राचा एकच भाग आपल्याला सतत दिसत असतो. आपण चंद्रबिंब जास्तीत जास्त 59 टक्के (कोर असताना) बघू शकतो. बाकी चंद्राने त्याची दुसरी बाजू आपल्यापासून दडवलेलीच असते.मात्र चांद्रपरिक्रमा करणारे ‘ओरायन’ चंद्राचे संपूर्ण ‘दर्शन’ घेऊन बारीकसारीक निरीक्षणे नोंदवू शकते. 1972 नंतर अमेरिकेला पुन्हा चंद्राचा एवढा सखोल अभ्यास का करावासा वाटला त्याचे कारण पुढचे संशोधनही ‘व्यावसायिक’ प्रकल्पांसाठी असणार आहे. ‘टेस्ला’वाले इलॉन मस्क आताच मंगळ पर्यटनाच्या भराऱ्या मनातल्या मनात मारतायत, पण ते प्रत्यक्षात उतरणे कठीण नाही. समजा, उद्या मंगळावर जायचे ठरलेच तर पृथ्वीव्यतिरिक्त अंतराळात एखादा मधला ‘तळ’ विकसित करता आला तर?

त्या दृष्टीने ‘नासा’लासुद्धा चंद्राचे महत्त्व वाटते. ‘ओरायन’ यान चार जणांना घेऊन चंद्रावर जाईल आणि काही काळ तिथे थांबून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परत येईल. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर उतरला तेव्हा तो ज्या ‘इगल’ यानातून चांद्र भूमीवर गेला ते तिथेच सोडून द्यावे लागले. ते यान ‘लॅन्डर’ फक्त चंद्राभोवती फिरणाऱ्या ‘अपोलो-11’ पर्यंतच परत आले. दोन यानांची जुळणी झाली आणि ‘इगल’ला वाऱ्यावर सोडण्यात आले, मात्र त्याला अनेक रास्त कारणे होती. आता ‘ओरायन’मध्ये मानवी आकाराचे पुतळे (मॅनेकीन) बसवलेले आहेत. पुढच्या टप्प्यात खरी माणसे जातील, पण लगेच चंद्रावर उतरतील असे नाही. ते अंतराळयात्रीही चंद्राचे जवळून निरीक्षण करतील. चांद्रपृष्ठावर नेमकी सुरक्षित जागा कोणती, याची निश्चिती झाल्यानंतरच मग चांद्रप्रवास अवाक्यात येईल. काही (श्रीमंत) सामान्य चांद्र प्रवासी चंद्रावर फेरफटका मारून येतील. हे सारे 2025 नंतर शक्य होईल पिंवा कधी शक्य होईल त्याचा अंदाज येईल. त्यासाठी अर्टेमिस मालिकेतली पुढची याने सज्ज असतील. सगळे सुरळीत झाले तर सध्या विमानातून परदेशी जाता येते तसे अंतराळ यानातून चंद्रावर जाता येईल. तेव्हा तयारीत राहा!

[email protected]