अमेरिकन सैन्याची सीरियात मोठी लष्करी कारवाई, बगदादी ठार? 

2264

दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्या ठिकाण्यांवर अमेरिकन सैन्याने हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी सैन्यातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या बातमीला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईत बगदादीचा खात्मा करण्यात आला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र याबाबत अद्याप अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील असे बोलले जात आहे.

शनिवारी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने सैन्याने सीरियातील इदबिल प्रांतात ही कारवाई केली आहे. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत, ‘नुकतेच काहीतरी मोठे घडले आहे.’ असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटवरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याआधीही बगदादीला ठार मारल्याबद्दलच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र इसिसने नेहमीच या बातम्यांना नाकारले आहे.

यावर्षी एप्रिलमध्ये आयसिसने बगदादीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी बगदादीने स्वीकारली होती. सीरियामधील इसिसचे ठिकाणे उध्वस्त केल्याच्या बदल्यात श्रीलंकेत हल्ला केला असल्याचे बगदादीने या व्हिडीओत म्हटले होते. या व्हिडीओत बगदादी व्यतिरिक्त आणखीन तीन दहतवादी दिसत होते.

आपली प्रतिक्रिया द्या