Mississippi Tornado अमेरिकेतील मिसिसिपी राज्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा; 26 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याला टोरनेडो या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून यात आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात अनेक जण जखमी झाले असून काही लोक इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळाचा सिल्व्हर सिटी, रोलिंग फोर्क या शहरांसह 160 किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला असल्याचे राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाने 100 मैलांपेक्षा जास्त अंतरावर नुकसानीचा फटका बसला आहे. या परिसरात मुसळधार पावसात गोल्फच्या चेंडूंएवढ्या मोठ्या गारा पडल्या आहेत. पश्चिम मिसिसिपीमधील 200 लोकांचे शहर असलेल्या सिल्व्हर सिटीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यानंतर शोध आणि बचाव पथके वादळात वाचलेल्या लोकांचा शोध घेत असताना चार लोक बेपत्ता होते.

मिसिसिपीच्या रोलिंग फोर्क शहराला सर्वात जास्त फटका बसला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, रोलिंग फोर्क या 1,700 लोकसंख्या असलेल्या गावात शोध आणि बचाव सुरू आहे. चक्रीवादळाचा वेग इतका वेगवान होता की, यामुळे 30 हजार फुटांवर ढिगारा साचला गेला आहे. धित भागात बचाव कार्य सुरू असल्याचे मिसिसिपीचे महापौर टेट रीव्हस यांनी सांगितले.

गव्हर्नर टेट रीव्ह यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, एमएस डेल्टामधील अनेक लोकांना आज रात्री तुमच्या प्रार्थना आणि देवाच्या संरक्षणाची गरज आहे. आम्ही प्रभावित झालेल्यांसाठी वैद्यकीय सहाय्य रवाना केले आहे. अधिक रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सामग्रीही मागवली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. .

अमेरिकेत शुक्रवारी मिसिसिपीला धडकलेल्या चक्रीवादळाने 2011 मध्ये मिसूरी जोप्लिनला धडकलेल्या चक्रीवादळाची आठवण करून दिली. या चक्रीवादळात 161 जणांचा मृत्यू झाला. वादळामुळे प्रचंड विध्वंस झाला होता.