ईशान्येकडील राज्यांत जाऊ नका, अमेरिका, ब्रिटन, इस्रायलचा आपल्या पर्यटकांना इशारा

467

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाची प्रतिमा मलिन होत आहे. अमेरिका, ब्रिटन तसेच इस्रायलने आपल्या पर्यटकांना पूर्वोत्तर राज्यांत जाऊ नका असा इशारा दिला आहे तर दुसरीकडे सहाव्या दिवशीही अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब धुमसत होता. आसामात ‘आसू’ संघटनेने तीन दिवसांचा सत्याग्रह करण्याचे जाहीर केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱया जामिया मिलिया विद्यापीठाच्या 42 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. पूर्वोत्तरातील अस्थिर परिस्थितीमुळे बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही आपला हिंदुस्थान दौरा रद्द केला आहे. अमेरिकेने तर अधिकृतरीत्या आसामचा दौराच रद्द केला आहे. सहा दिवसांपासून या राज्यांमध्ये फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेने विशेष गाडय़ा चालवल्या. हिंसाचार उफाळलेल्या राज्यांतील इंटरनेट सेवा अजूनही खंडितच आहे.

‘जामिया’च्या परीक्षा पुढे ढकलल्या
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन केले. आजही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी 42 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाला 16 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत सुट्टय़ा देण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे देशभरात असंतोषाचा वणवा पेटला आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये याची धग जास्त आहे. गेल्या सहा दिवसांपासून आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल, नागालँड, मिझोरम ही राज्ये हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत आहेत.

आसामात ‘आसू’ संघटनेने तीन दिवसांचा सत्याग्रह करण्याचे जाहीर केले असून नागा स्टुडंट फेडरेशनने आज पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. त्रिपुरातील परिस्थिती अजूनही निवळलेली नाही. येथे आजही विद्यार्थ्यांनी संचारबंदी मोडून निदर्शने केली. आसामात काही जिल्हय़ांत परिस्थिती सुधारत असल्यामुळे तेथे सकाळी संचारबंदी शिथिल करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या