‘पृथ्वी गोल नाही’ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अंतराळवीराने गमावला जीव!

1603

पृथ्वी गोल आहे, हे आपण पुस्तकातून शिकलो आहोत. चंद्रावरून आणि अवकाशातून काढण्यात आलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रातही पृथ्वी गोल असल्याचे दिसून येते. मात्र, काहीजण आपल्या विचारांवर ठाम असतात. ते सिद्ध करण्यासाठी केलेले धाडस त्यांच्या जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना अमेरिकेचे अंतराळवारी माइक ह्युजेस यांच्यासोबत घडली आहे. पथ्वी गोल नाही, या आपल्या मतावर ते ठाम होते. हे सिद्ध करण्यासाठी त्यांचे अनेक प्रयोग सुरू होते. स्वतः बनवलेल्या रॉकेटच्या मदतीने त्यांनी शनिवारी उड्डाण केले. मात्र, थोड्याच उंचीवर गेल्यावर या रॉकेटचा स्फोट झाला आणि ते कॅनीफोर्नियाजवळ कोसळले. या दुर्घटनेत माइक यांचा मृत्यू झाला आहे. माइक ह्युजेस करत असलेल्या खटाटोपांमुळे त्यांना मॅड माइक ह्युजेस या नावानेही ओळखले जात होते. या दुर्घटनेची माहिती सायन्स चॅनेलने ट्विटरवर दिली आहे.

ह्यूजेस यांना अतंराळात जाण्याची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी त्यांचे अनेक प्रयत्न आणि प्रयोग सुरू होते. ह्यूजेस लिमोजिनचे प्रसिद्ध ड्रायव्हर होते. त्यांच्या नावावर लाँगेस्ट लिमोजिन रँप जंपचा विक्रम गिनीज बुकात नोंदला गेला आहे. 2002 मध्ये त्यांनी त्यांची लिमोजीन कार 1.3 फूट उंचीवरून जंप केली होती. पृथ्वी गोल नाही हे सिद्ध करण्यासाठी माइक यांनी नवा प्रयोग केला होता. त्यांनी स्वतः वाफेवर चालणारे पॅराशूट बनवले होते. शनिवारी त्यांनी या पॅराशूटच्या मदतीने बनवलेल्या रॉकेटने उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर 10 सेकंदातच ते कोसळले. उड्डाणानंतर पॅराशूटला काहीतरी धडकल्याने पॅराशूटला नुकसान झाल्याने दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याआधीही अनेकदा माइक यांनी अंतराळाची यात्रा करण्याचा प्रयत्न केला होता. 2018 मध्ये त्यांनी दोन पॅराशूटच्या मदतीने रॉकेटने उड्डाण केले होते. त्यानंतर खाली उतरताना पॅराशूटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते 1875 फूटांवरून कोसळले होते. कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटी भागात त्यांचे रॉकेट कोसळले होते. या दुर्घटनेत माइक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मानेलाही गंभीर दुखापत झाली होती. अशा प्रयोगांमुळे जीवाला धोका असल्याची जाणीव असूनही माइक यांनी त्यांचे प्रयोग सुरुच ठेवले होते.

अंतराळाच्या एका निश्चित टोकापर्यंत जाण्याची आपली इच्छा असल्याचे माइक यांनी एका व्हिडियोत म्हटले होते. त्या टोकापर्यंत जाऊन पृथ्वी गोल नाही, हे आपल्याला सिद्ध करता येईल असे ते म्हणाले होते. आपल्या जीवनातील हे असाधारण काम आहे, माझे काम आणि मी करत असलेले प्रयोग अविश्वसनीय आहेत, असेही माइक सांगत होते. त्यामुळे त्यांना मॅड माइक ह्युजेस या नावाने ओळखले जात होते. अशाच एका धाडसी प्रयोगात त्यांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या