अमेरिकन बास्केटबॉलपटू ब्रायंटच्या अपघाताचे भाकित 8 वर्षानंतर ठरले तंतोतंत खरे

2288

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट (41) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. हवेत असताना हेलिकॉप्टरला आग लागून हा अपघात झाला. मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. कोबीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर क्रीडापटूंसह त्याच्या चाहत्यांनीही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याच दरम्यान, एक आठ वर्षापूर्वीचे ट्वीट व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारे ट्वीट 14 नोव्हेंबर, 2012 रोजी पोस्ट करण्यात आले होते. या ट्वीटमध्ये कोबी ब्रायंट याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू होणार अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आल्याचे दिसत आहे. डॉय नोसो (@dotNoso) नावाच्या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट पोस्ट करण्यात आले होते. आता कोबी ब्रायंट याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे.

अनेकांनी हे ट्वीट एडीट करून त्याची तारीख बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे तंतोतंत भाकित कसे वर्तवले जाऊ शकते असे म्हणत आश्चर्यही व्यक्त केले आहे. मॉर्गन नावाच्या एका ट्विटर युझरने हे ट्वीट खोटे असून कार्बन नावाच्या अॅपचा वापर करून याची तारीख बदण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु माईक बेसली (Mike Beasley) नावाच्या ट्विटर व्हेरिफाईड अकाऊंटवरून एका युझरने हे ट्वीट खरे असल्याचा दावा केला आहे. तसेच ट्विटरवर एकदा ट्वीट शेअर केल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याचेही म्हटले आहे.

अपघाती मृत्यू
बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याच्या हेलिकॉप्टरला लॉस अँजेलिसपासून 65 किलोमीटर अंतरावर अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचे होते. आग लागून हेलिकॉप्टर झुडपात कोसळले. त्यामुळे तिथेही आग लागली. आगीमुळे बचाव पथकाला मोठय़ा अडथळय़ांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की, हेलिकॉप्टरमधील कुणीही वाचू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या