अमेरिकेच्या जेबिल कंपनीचा महाराष्ट्रात दोन हजार कोटींचा प्रकल्प, पुणे जिल्ह्यात सरकार जमीन देणार

अमेरिकेच्या जेबिल कंपनीने महाराष्ट्रात सुमारे दोन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. पुणे जिह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.

या प्रकल्पाच्या संदर्भात आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत कंपनीच्या प्रतिनिधींनी वेबिनारद्वारे चर्चा केली. या वेळी जेबिल कंपनीचे हिंदुस्थानातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी यावेळी उपस्थित होते.

उद्योग विभागाचे सहकार्य

जेबिल कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल. या प्रकल्पामुळे गुंतवणूकवाढीला हातभार लागेल. शिवाय मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होईल. कंपनीला रेडी शेड, जमीन व इतर सुविधा प्राधान्यांने दिल्या जातील असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

– इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल कंपनी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात स्मार्ट फोन, मोबाईलचे सुटे भाग, स्मार्ट गृहोपयोगी वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाचे वेष्टन निर्मिती आदी क्षेत्रात आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर सुमारे 13 हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या