सांगण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा! पोलीस अधिकाऱ्याने थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फटकारले

1432

आफ्रिकन वंशाच्या नागरिकाच्या मृत्युनंतर उसळलेल्या हिंसाचाराचा आगडोंब अमेरिकेत कायम असतानाच राष्ट्राध्यख डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहेत. यामुळे ह्युस्टन पोलीसप्रमुख ट्रम्प यांच्यावर भडकले. सांगण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा, गप्प राहा. अमेरिकेच्या रस्त्यांवर जे सुरू आहे तो हॉलिवुडचा सिनेमा नाही, हे वास्तविक चित्र आहे असे ट्रम्प यांना सुनावले आहे.

मिनियापोलिस शहरात जॉर्ज फ्लॉयड या आफ्रीकन वंशाच्या कृष्णवर्गीय नागरिकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. यामुळे गेली सहा दिवस अमेरिकेत राजधानी वॉशिंग्टन, न्युयॉर्कसह 40 शहरांत आगडोंब सुरू आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी मोडून हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरू असताना महासत्ता अमेरिकेत प्रचंड हिंसाचार सुरू आहे.

ट्रम्प काय म्हणाले

मिनियापोलिस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बळाचा वापर करून हिंसाचार थांबवा असे आदेश दिले होते. तुम्ही वेळ वाया घालवत आहात. आंदोलक तुमच्यावर धावून येतील. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलकांना पावाच्या तुकडय़ासारखे चिरडून टाकले आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य केली.

पोलीसप्रमुखांचे जोरदार उत्तर

ट्रम्प यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर ह्युस्टन पोलीसप्रमुख आर्ट असीवेदो चांगलेच भडकले. तुमच्याकडे बोलण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा. दयाळूपणा म्हणजे कमकुवतपणा नाही. पोलिसांनी जनजीवन पूर्वपदावर आणले. ते तुम्ही बिघडू नका. हॉलिवुडचा सिनेमा नाही, वास्तव जीवन आहे हे लक्षात ठेवा, असे असीवेदो यांनी थेट राष्ट्राध्यक्षंनाच फटकारले.

लष्कराला बोलवू – ट्रम्प

अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार थांबला नाही तर लष्कर तैनात करू असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाच हिंसाचार भडकल्यामुळे अमेरिकेत प्रचंड तणाव वाढला आहे. या पार्श्वभुमीवर ट्रम्प आता लष्करी बळाचा वापर करण्याच्या स्थितीत आहेत.

आंदोलकांवर रबरी गोळ्या झाडल्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊस बाहेर

आंदोलकांनी रविवारी व्हाईट हाऊसला वेढा टाकल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना घाबरून बंकरमध्ये लपावे लागले होते. आंदोलकांचा वेढा सोमवारीही कायम होता. पोलिसांनी आंदोलकांवर रबरी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ट्रम्प यांना व्हाईट हाऊस बाहेर पडता आले. त्यानंतर ट्रम्प सेंट जॉन चर्चमध्ये गेले.

आपली प्रतिक्रिया द्या