अमेरिकेत बायडन पर्वाला सुरुवात! आज शपथविधी; हिंसाचाराची भीती

महासत्ता अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन उद्या (दि. 20) सूत्रे स्वीकारणार आहेत. कॅपिटॉल हिल येथे होणाऱया या शपथविधीबरोबरच अमेरिकेत बायडन पर्वाची सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्यात गोंधळ होण्याची भीती आहे. त्यामुळे 25 हजार नॅशनल गार्डस आणि हजारो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बुधवारी 11.30 वाजता ज्यो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील तर कमला हॅरीस उपराष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतील. जगभरात या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. हिंदुस्थानात रात्री 10.30 वाजता हा सोहळा लाईव्ह पाहाता येईल. या शपथविधी सोहळ्यात जेनिफर लोफेज आणि लेडी गॅगा अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार आहेत. तसेच 90 मिनिटे चालणाऱया या सोहळ्यात इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कॅपिटॉल हिल आणि व्हाईट हाऊस परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या