जो बायडेन बुधवारी घेणार राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ, इनॉग्रेशन डेनिमित्त वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन बुधवार 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहे. त्यानिमित्त राजधानी वॉशिंग्टनमध्ये होणाऱया इनॉग्रेशन डेच्या कार्यक्रमासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहेत. तसेच हा कार्यक्रम केवळ एक हजार ते बाराशे लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे सिनेटर आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यांसोबत केवळ एकाच पाहुण्याला प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर शपथविधी सोहळय़ानंतर होणारे वेलकम लंचही यंदा रद्द करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वकाही नियोजनानुसार पार पडत असले तर कोरोना महामारीचे संकट आणि 6 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये घातलेल्या हैदोसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा म्हणजे इनॉग्रेशन डेनिमित्त होणाऱया कार्यक्रमासाठी दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींना म्हणजे सिनेटर आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यांना जवळपास दोन लाख प्रवेश पास दिले जात होते. मात्र यंदा कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱयांच्या संख्येवर मर्यादा आणल्या असून जास्तीत जास्त बाराशे लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

उपराष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी पहिल्यांदाच महिलेकडे

बुधवारी जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार असून कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच उपराष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी महिलेकडे जाणार आहे. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या आई या हिंदुस्थानी होत्या.

राजधानीत अशी असेल सुरक्षा…

ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन डीसी परिसरात घातलेल्या हैदोसाची प्रसासनाने गंभीर दखल घेतली असून असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी राजधानीत कडेकोड सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सहा हजार नॅशनल मिलिट्री गार्डसह 15 हजार पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार असून सिव्रेट सर्व्हिस, फेडरल एजन्सीशिवाय अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलंस अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी तारेचे स्पेशल फेंसिंग करण्यात आले आहे.

बायडेन प्रशासनात 20 हिंदुस्थानी वंशाच्या लोकांवर महत्त्वाची जबाबदारी

जो बायडेन यांच्या प्रशासनात अमेरिकेच्या प्रत्येक घटकाला स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनातील 13 महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली आहे, तर हिंदुस्थानी वंशाच्या 20 लोकांकडेही प्रशासनातील महत्त्वाच्या जबाबदाऱया देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अमेरिकन जनरल सर्जन म्हणून डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वनिता गुप्ता यांना कायदे मंत्रालयाच्या सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले आले आहे. परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी उजरा जेया यांना असैन्य सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकारचे आवर परराष्ट्रमंत्री ही जबाबदारी दिली आहे. समीरा फाझिली यांना राष्ट्रीय उपसंचालक मंडळाच्या उपसंचालक पदावर नियुक्त केले आहे. तसेच व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानी वंशांच्या तिघांना स्थान मिळाले आहे. त्यामध्ये तरुण छाबडा यांना तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे संचालक, सुमोना गुहा यांना दक्षिण आशिया विभागासाठी वरिष्ठ संचालक तर शांती कलाथिल यांना लोकशाही व मानवाधिकार समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या