हिजबुलच्या दहशतवाद्याकडे अमेरिकेन बनावटीची रायफल

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दोन दिवसांपूर्वी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी या फोटोचा तपास सुरू केला असून या दहशतवाद्याच्या हातात असलेली रायफल अमेरिकेन बनावटीची असल्याचे समोर आले आहे. त्याच्या हातात एआर-१५ एम४ ही रायफल असून ती फक्त अमेरिकेतच बनवली जाते.

आतापर्यंत कश्मीरमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी फक्त रशिया व चीनी बनावटीच्या रायफल वापरतात. त्यामुळे या दहशतवाद्याकडे अमेरिकेन बनावटीची रायफल कशी आली याचा गुप्तचर यंत्रणां तपास करत आहेत. ही रायफल इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धाच्यावेळी नाटोच्या सैनिकांनी वापरली होती.

पाकव्याप्त कश्मीरात आणि अफगाणिस्तानात जगातील सर्व प्रकारची हत्यारे मिळतात. तिथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळते पण रशिया व चीनी बनावटीच्या रायफल स्वस्त असल्यामुळे बहुतांश दहशतवादी त्याच रायफल वापरतात. कदाचित काही दहशतवादी आता अमेरिकेन बनावटीच्या रायफल वापरू लागले असावेत, असे जम्मू कश्मीरमधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या