आम्ही खवय्ये – मासे… मटण… धावतं पिठलं

दिग्दर्शक, अभिनेते राजन ताम्हाणे 

 ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– फक्त उदरभरण म्हणजे खाणं नव्हे तर शरीरासाठी जे पौष्टिक आहे ते खायला हवं. खाणं वेगवेगळ्या प्रकारचं असावं.

खायला काय आवडतं?
– प्राधान्याने मासे, नंतर मटण आणि हे दोन्ही नसेल तर चिकन. शाकाहारीही खूप आवडतं. रोजही खाऊ शकतो.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– फिटनेसची काळजी विशेष घेत नाही, पण दादरला तळवलकर जिममध्ये जायचो. शाळेत दुसरीत असल्यापासून आई मला कच्चं अंड खायला द्यायची. त्यावर दूध प्यायला द्यायची. जवळजवळ बरीच वर्षे हा आहार घेतला त्यामुळे शरीर आजही सुदृढ आहे, असं वाटतं. नाटकाच्या सरावादरम्यान ८-९ तास उभं राहून काम करणं होतं.

नाटकाच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असताना आवडलेला खास पदार्थ
– शाकाहारी पदार्थांत पिठलं खूप आवडतं. माझी आई त्याला धावतं पिठलं असं म्हणायची एवढं पातळ असायचं. ते मी बाहेर हॉटेलमध्ये मागवतो आणि भाकरी,चपातीबरोबर खातो.

आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता?
– शक्यतो नाही. नाटकाच्या तालमीदरम्यानच होत. हॉटेलिंग आवडत नाही.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– दिनानाथ नाटय़गृहाजवळील हॉटेल आवडतं. कारण तिथे स्वच्छ, शाकाहारी जेवण मिळतं.

कोणतं पेय आवडतं?
– चहा. कधीतरी अंजिर, आवळ्याचं सरबत.

स्ट्रिट फुड आवडतं का?
– फारच आवडतं, पण ते कुठे मिळतं त्यावर अवलंबून आहे. शिवाजी मंदिरच्या बाजूला मिळणारी पाणीपुरी, बिंबीसारला मिळणारा मसाला डोसा, इडली खातो.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– साबुदाण्याची खिचडी, सगळ्या प्रकारच्या भाज्या. महत्त्वाचं म्हणजे मला कशालाही नावं न ठेवता खाण्याची सवय आहे.

उपवास करता का?
– फक्त गणेशचतुर्थी.

आपली प्रतिक्रिया द्या