महाराष्ट्रात जुईश वारसा स्थळे विकसित करणार – अमित देशमुख

777

इस्राईल आणि महाराष्ट्राचे घनिष्ठ संबंध येणाऱ्या काळात अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई येथे जुईश वारसा स्थळे विकसित करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. जुईश वारसा स्थळांमुळे इस्राईल संयुक्त राष्ट्र तसेच जगातील सर्व पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शनिवारी छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय येथे जेरुसलेम-मुंबई महोत्सवाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेरुसलेमचे महापौर मोशे लियोन यांच्यासह इस्राईलचे मुंबईचे काऊन्सलेट जनरल याकोव्ह फिन्केस्टिन, जेरुसलेम येथील अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग आणि जेरुसलेम महानगरपालिका यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवास देशातील इस्राईल वाणिज्य दूतावास, हिंदुस्थान- इस्राईल चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशन, जेरुसलेम महानगरपालिकेचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, आशियात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या जेरुसलेम महोत्सवाचे यजमानपद मुंबईला मिळणे हा महाराष्ट्राचा गौरव आहे. जेरुसलेम- मुंबई महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि इस्राईलमधील आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवामुळे इस्राईल-जेरुसलेमचे वैभव मुंबईला समजण्यास मदत होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना जेरुसलेमचे सांस्कृतिक दर्शन होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवामुळे कलात्मक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन मिळणार आहे. हिंदुस्थान आणि जेरूसलेमला प्राचीन सभ्य संस्कृती लाभली असून आज हे एक आधुनिक राष्ट्र म्हणून प्रस्थापित आहे. हिंदुस्थानप्रमाणे जेरुसलेममध्ये देखील शेती, पाणी, वाहतूक, शिक्षण यासारखी आव्हाने आहेत. महाराष्ट्रात साधारण दोन हजार वर्षापूर्वी जुईश राहायचे. महाराष्ट्रात ते तेलाचा व्यवसाय करत असल्यामुळे आणि शनिवारी आराम करत असल्यामुळे त्यांना इकडे शनिवार तेली असे संबोधिले जात असे. त्याचप्रमाणे साधारण 100 वर्षांपूर्वी आणखी एक जुईश समुदाय मुंबईत राहत होता. जुईश समुदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आधीपासून समरस आहे.

हिंदुस्थानच्या विकासात काही जुईश मान्यवरांनी विशेष योगदान दिले आहे. यामध्ये डेव्हिड ससून यांचा समावेश आह.डेव्हिड ससून लायब्ररी, डेव्हिड ससून रुग्णालय, भाऊचा धक्का इत्यादी जुईश समुदायाची देण आहेत. अभिनय क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला असून असून कला, शिक्षण आणि सिनेविश्वात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. इस्राईलमध्ये मराठी बोलणारे लोक हे अधिक प्रमाणात आहेत. इस्राईलमध्ये 1996 ला आंतरराष्ट्रीय मराठी परिषद झाली होती. या परिषदेत वरिष्ठ राजकारणी, पत्रकार, कवी इत्यादींनी हिरीरीने भाग घेतला होता. इस्राईलमध्ये शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे हिला कृषी पंढरी असेही म्हणतात. इस्राईल वापरत असलेले कृषी तंत्रज्ञान महाराष्ट्रात ही वापरले जावे. हिंदुस्थानात मुस्लिम,जुईश असे अनेक अल्पसंख्याक समुदाय असताना हा देश सौख्याने नांदतो.

मोशे लियो म्हणाले की, जेरुसलेम हे विविध कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रेरणास्थान आहे. या महोत्सवामुळे मुंबईकरांना जेरुसलेमचे सांस्कृतिक दर्शन घडण्याबरोरबच भविष्यात सिनेमा, पर्यटन, तंत्रज्ञानाची दालने खुली होणार आहेत. याशिवाय संगीत, पाककला अणि नृत्य क्षेत्रात देशांमधील कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवामुळे इस्राईल आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा मेळ होणार आहे.

जेरुसलेम- मुंबई महोत्सवात दोन्ही शहरांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन या महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्यांना होणार आहे. जेरुसलेम- मुंबई महोत्सव सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात शेफ अमनिंदर संधू आणि इस्राईली शेफ इलान गरुसी यांची फ्यूजन रेसिपी रसिकांना चाखायला मिळणार आहे. कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे यांचे कथ्थक सादरीकरण आणि ‘द मोसाद’ हा धमाल विनोदी चित्रपट या महोत्सवात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या