CAB विरोधात ईशान्य हिंदुस्थानात हिंसाचार उफाळला; अमित शहा यांचा दौरा रद्द

786

नागरिकता सुधारणा कायद्याला ईशान्य हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या विरोधात आसामसह इतर पूर्वोत्तर राज्यातील हिंसाचार वाढला असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. हिंसाचार वाढल्याने शिलाँगमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. ईशान्य हिंदुस्थानात या कायद्याला वाढता विरोध आणि हिंसाचारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला ईशान्य हिंदुस्थानचा दौरा रद्द केला आहे. नॉर्थ ईस्ट पोलीस अकादमीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहा रविवारी शिलाँगमध्ये येणार होते. आता त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.

कायद्याविरोधात शिलाँगमध्ये राजभवनाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिलाँगपासून 250 किलोमीटर लांब असणाऱ्या विलियमनगर भागात आंदोलकांनी मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना घेराव घातला. मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी तिथे आले होते. तसेच आंदोलकांनी ‘कोनराड गो बॅक’ चे फलक झळकवले. मेघालयात कायद्याविरोधात तीव्र आंदोलन होत असल्याने हिंसाचार भडकला आहे. त्यामुळे इंटरनेट, मोबाईल आणि एसएमएस सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. नागरी सुधारणा कायद्याला दिल्लीतही विरोध होत आहे. जामिया विद्यापीठाबाहेर विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या