संकटे नेस्तनाबूत करून चला जिंकूया… पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेचा निर्धार
.. औरंगजेबाची कबर बांधली तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात बांधणार
लोकसभा निवडणुकीत जेवढे वळ तुमच्या पाठीवर उठलेत त्यापेक्षा अधिक वळ येणाऱ्या विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल!
अमित शहा हे अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. होय, मी आजपासून अमित शहांना अहमदशहा अब्दालीच म्हणणार, असा घणाघात करतानाच लोकसभा निवडणुकीत जेवढे वळ तुमच्यावर उठलेत त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल. ज्याप्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली, त्याप्रमाणे भाजपची कबर महाराष्ट्रात बांधायची आहे, असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. पुणे येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि तमाम शिवसैनिकांनी येणारे प्रत्येक संकट नेस्तनाबूत करत ‘चला जिंकूया’ असा संकल्प केला.
विधानसभा निवडणूक तुम्ही कधीही घ्या. आता पावसाचे थैमान आहे. पावसाचे थैमान झाल्यानंतर भगव्याचे थैमान सुरू होईल. भगवं वादळ महाराष्ट्रात येईल आणि अमित शहांना सांगतोय, अब्दालीला सांगतोय, लोकसभा निवडणुकीत जेवढे वळ तुमच्या भाजपच्या पाठीवरती उठलेत त्याच्यापेक्षाही जास्त वळ विधानसभा निवडणुकीला उठतील. निकालानंतर भाजपवरती एवढे वळ उठलेले असतील की आणखी वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल, असा हल्ला चढवताना ही वळवळ गाडण्यासाठी सज्ज व्हा. हातामध्ये मशाल घ्या आणि या चोरबाजाराला, दरोडेखोरांना धडा शिकवा. जशी औरंगजेबाची कबर आपण येथे बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रात बांधा, अशी साद उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली.
अहमदशहा अब्दालीचा राजकीय वशंज अमित शहा. अहमदशहा अब्दाली तोही शहा होता आणि हेसुद्धा शहा आहेत. अहमदशहा अब्दालीचा हा राजकीय वंशज इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे, नवाज शरीफचा केक खाणारी औलाद तुमची, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं…का आम्ही हिंदुत्व सोडू?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी त्यांचे म्हेरके म्हणजेच अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा महाराष्ट्रात आले होते, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. स्वराज्यावर चाल करून पुण्यात आलेला शाहिस्तेखानाचा दाखला देऊन उद्धव ठाकरे म्हणाले, शाहिस्तेखानाचे बोटावर निभावले. तो हुशार होता म्हणून पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरदेखील अमित शहा महाराष्ट्रात परत आले. त्यांनी शहाणपण घेतलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांना आग्य्रात कैद केले. राज्य, गड, खजिना, सैन्य हे सर्वच गमावले होते. काहीच शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत तेथून मोठय़ा शिताफीने सुटून आल्यानंतर पुन्हा त्यांनी मूठभर असतील, पण मावळय़ांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताडावरती भगवा रोवून स्वराज्याची स्थापना केली. ती लढाई वेगळी होती. त्याचप्रमाणे आता आपला शिवसेना पक्ष चोरला, चिन्ह चोरले, वडिलांचा फोटो चोरला. मग आपण हे का करू शकत नाही. आपणही शेकडो संकटे नेस्तनाबूत करून… चला जिंकूया, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.
स्वराज्याचा घात केला तो गद्दारांनी केला आहे. त्या काळात मिर्झाराजे प्रचंड सैन्य घेऊन आला. त्याने ओळखले छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव सिंहासनात अडकलेला नाही. तो जनतेमध्ये अडकलेला आहे. कारण हे रयतेचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेचा प्राण महत्त्वाचा आहे हे ओळखून त्याने जनतेची कत्तल सुरू केली. त्यामुळे महाराजांसमोर पर्याय नव्हता. राज्य, गड, खजिना सर्वस्व गेले, परंतु त्यांनी पुन्हा स्वराज्य उभे केले. महाराजांप्रमाणे मग आपणही का नाही करू शकत? तेव्हा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय नव्हते. तलवार घेऊन समोरासमोर भिडायचे. कुणाचा हात कापला जायचा, कुणाची गर्दन कापली जायची. आपणही आता सगळी संकटे परतवून लावू.
खरं तर मी जाहीर सभाच घेणार होतो. कारण आता लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंहगर्जना करणारे असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे या पुण्यातले. पुण्यातूनच त्यांनी इंग्रजांच्या विरोधात देशभर लढा दिला, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत. जनतेत त्यांच्याविरुद्ध असंतोष आहे. शिवसैनिकांनी या असंतोषाचा वणवा महाराष्ट्रभर पेटवावा आणि ‘महाराष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारच!’ असा निर्धार करावा, असे आवाहन केले.
लाडक्या योजनेतून मत विकत घेत आहात
लाडकी बहीण योजना देऊन तुम्ही मत विकत घेत आहात? असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. भिकेवर जगणारा नाही. 1500 रुपयांत घर चालवणार आहात का? हक्काचं मागितले तर ईडी आणि सीबीआय मागे लावतात. हेच मोदी-शहा यांचे धोरण आहे, अशी टीका त्यांनी केली.
…‘वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतय का?
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणली. पण अहो मुनगंटीवार, नखाच्या मागे वाघ असतो ना, तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून वाघ होते. म्हणून त्या वाघनखांना महत्त्व आहे. नखाच्या मागे जर मुनगंटीवार असेल… तर पेलवतय का ते तुम्हाला? ‘वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतय का?, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
संघाचे हिंदुत्व शहांना मान्य आहे का?
आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातल्यानंतर तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली दोन पत्रे दाखला देऊन वाचून दाखवली. संघाचे कार्यक्षेत्र हिंदू समाजासाठी असले तरी अन्य धर्माच्या विरोधातील शिकवण संघात दिली जात नाही. संघात मुस्लिम द्वेष शिकवला जातो, असे म्हणणेदेखील चुकीचे आहे. संघ इतर धर्मांचा द्वेष करत नाही, असे त्यांच्या पत्रात म्हटले आहे. मग संघाचे हिंदुत्व अमित शहा यांना मान्य आहे का? हे स्पष्ट करा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
चंद्राबाबू, नितीश हिंदुत्ववादी आहेत का?
भाजपने विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. मात्र तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे? त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला.
पुण्यातील रिव्हर फ्रंटमध्ये कॉण्ट्रक्टर माझा लाडका
पुण्यातील पूर आपत्तीचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी रिव्हर फ्रंट प्रकल्पाची चिरफाड केली. पुराचा फटका बसल्यामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. याचा संपूर्ण दोष निसर्गावर टाकत नाही. परंतु जे काही चुकले ते म्हणण्यापेक्षा या चुका म्हणजे एक प्रकारचे गुन्हे आहेत ते करणाऱ्यांना फासावर लटकविले पाहिजे, असे बजावून उद्धव ठाकरे यांनी मुळा-मुठा नदीमधील नाईकबेट परिसराचा रिव्हर फ्रंट योजनेपूर्वीचा आणि काम केल्यानंतरचा नकाशाच झळकवला. एका बाजूने भराव टाकून प्रवाह बंद केला. असे काम केले तर पुणे पाण्यात जाणारच. आपले सरकार असताना रिव्हर फ्रंट या योजनेला स्थगिती दिली होती, परंतु ही स्थगिती उठवून नदीत भराव टाकला जात आहे. भाजपाला पुण्याचा विकास नाही तर पैशाचा विकार आहे. दिल्लीमध्ये जे नवीन संसद भवन बांधले तोच कॉण्ट्रक्टर पुण्यातील नदी सुधार योजनेचे काम करत आहे. कॉण्ट्रक्टर माझा लाडका अशी योजना राबवून पुणे पाण्यात गेले तरी चालेल, पण कॉण्ट्रक्टरचे खिसे भरले पाहिजेत, ही भाजपची भूमिका आहे. परंतु तीन महिने थांबा. तुमचा हिशेब चुकता करू, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे, मी लक्ष घातलं नाही. कारण इथले सुभेदार बसले होते. म्हटलं करत असाल तर करा, चांगभलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला.
एवढय़ा जागा, तेवढय़ा जागा नाही, तर मला अख्खा महाराष्ट्र हवा आहे. मला महाराष्ट्राचा कानाकोपरा स्वाभिमानाने फुललेला, पेटलेला पाहिजे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या व्यापारी हुकूमशहांच्याविरुद्ध रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे आहे. तो वणवा पेटवण्याचे काम तुम्हा सर्वांना करायचे आहे.
कोर्टाला अखेरची विनंती
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल ही निशाणी जाणीवपूर्वक निवडली. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. पाच, दहा किंवा 50 वर्षांत नक्की निकाल लागेल, असे उपाहासात्मक बोलून आता मी न्याय मागायला जनतेच्या न्यायलयात जात आहे. आजपासून जनतेच्या न्यायालयात लढाई सुरू झाली आहे. कोर्टाला आज शेवटची विनंती करतो. नाहीतर आता नाद सोडतो. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त आमची नाही. न्याय मिळण्यासाठी विलंब होत असेल तर आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ. हा लढा उद्धव ठाकरेंचा नाही, हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे.
…हे गळती सरकार
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराला गळती लागली आहे. बारा महिन्यांपूर्वी बांधलेले नवे संसद भवन गळत आहे, ज्याने संसद बांधली. तोच पुण्यातील नदीसुधारचे काम करत असल्याची माझी माहिती आहे. कंत्राटदार माझा लाडका सुरू आहे. तोही गुजरातचा आहे. मोदी काँग्रेसकडे 70 वर्षांचा हिशेब मागत आहेत. 70 वर्षांत काय केलं असे विचारत आहेत. पण तुमच्या काळात राम मंदिर, संसदेला गळती लागली आहे. पेपर लीक होत आहे त्याचा हिशेब द्या. मग काँग्रेसला विचारा. हे गळती सरकार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला.
भगवा झंझावात
पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंचच्या सभागृहामध्ये आयोजित शिवसेना गटप्रमुखांच्या शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार घणाघात केला. या शिबिरासाठी पुणे शहर आणि जिह्यातून प्रचंड संख्येने गटप्रमुख आणि पदाधिकारी वाजतगाजत आले होते. संपूर्ण गणेश कला- क्रीडा मंच खच्चून भरला होता. सर्वत्र भगवे ध्वज, शिवसेनेचा जयजयकार यामुळे भगवा झंझवात संचारला होता. सभागृहाच्या बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता, तर सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि विरोधकांना अक्षरशः धुतले.
‘टरबूज’जाऊ द्या हो, त्याला खड्डय़ात घाला’
सगळीकडे खड्डे आहेत. गडकरी म्हणत होते असे रस्ते बांधीन की, दोनशे वर्षे खड्डाच पडणार नाही. मुंबई-गोवा मार्ग बघा. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. त्याचे फोटो काढा आणि त्यांना ‘खड्डा पुरुष’ पुरस्कार द्या अशी खिल्ली उडवली. तेव्हा खालून ‘टरबूज टरबूज’ असा उल्लेख झाला. त्यावर टरबूज जाऊ द्या हो. त्याला खड्डय़ात घाला, असे म्हणताच सभागृहात हास्याचा पाऊस पडला.
मी ढेकणाला कधी आव्हान देत नाही!
एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे वाक्य पुन्हा उच्चारत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोडून काढले. इकडे माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. (गर्दीतून टरबूज टरबूज असा आवाज घुमला) काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा, टोळक्यांचा अख्खा पक्ष, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली. ढेकणाला कधी आव्हान द्यायचे नसते. ढेकणं अशी अंगठय़ाने चिरडायची असतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. कोणाला तरी वाटलं की, मी त्यालाच बोललो. मग तो म्हणाला, माझ्या नादाला लागू नका. अरे, तुझ्या नादाला लागण्याएवढय़ा कुवतीचा तू नाहीच आहेस, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
हा भाजपचा सत्ता जिहाद
एक नवा शब्द त्यांनी काढला आहे. हिंदू-मुसलमान मुलामुलीचं लग्न झालं आणि काही झालं की त्याला लव्ह जिहाद म्हटले जाते. मग तसंच मी म्हणतोय, तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताहात. पक्ष फोडताय. पक्ष चोरताय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुसलमानांसाठी काही असेल तरीही तुम्ही त्यांनी जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व सांगितल्यानंतर त्यात मुसलमान आमच्यासोबत असतील तर तुम्ही आम्हाला औरंगजेबाचे फॅन क्लब म्हणता. मग तुमचं जे काही चाललं आहे हा ‘सत्ता जिहाद’ नाही का? हो, हा सत्ता जिहादच आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते तुम्ही करताय. म्हणजे तुम्ही काहीही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे असेच चाललेय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मी अमित शहांना आजपासून अहमदशहा अब्दालीच म्हणणार. मला नकली संतान म्हणताना त्यांना लाज नाही वाटली. मला औरंगजेब फॅन क्लब म्हटले तेव्हा त्यांची जीभ नाही अडखळली मग त्यांना अहमदशहा अब्दाली बोलायला मी का घाबरू? तुम्हाला हा अब्दाली पाहिजे की मी पाहिजे, हे तुम्ही ठरवायचे आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे, औरंगजेब पाहिजे की भगवा हातामध्ये घेतलेला शिवसैनिक पाहिजे हे जनतेने ठरवायचे आहे.
प्रत्येक शाखेवर वाघ आणि मशाल!
ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना केले. अनेक ठिकाणी आपल्या शाखांच्या बोर्डवरती आजही धनुष्यबाण आहे. आता मला तिकडे मशाल हवी आहे. ही मशाल केवळ बोर्डवरतीच नको तर मशाल आपल्या हृदयात धगधगती पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आणखी एक गोष्ट या बोर्डवर हवी आहे, ती म्हणजे शिवसेनेचा वाघ! जो मुनगंटीवारांकडे नाही, जो भाजपकडे नाही… तुम्ही नखं घेऊन बसा, पण वाघ माझ्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला भीती दाखवू नका, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवाजी महाराजांची वाघनखं म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे आणि हीच वाघनखं घेऊन उद्याच्या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत, असा एल्गारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुकारला.