भाजपचा महाराष्ट्रात स्वबळाचा नारा, अमित शहांच्या घोषणेने मिंधे-अजितदादांची हवा टाईट

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यावरही भाजप नेते व केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येईल असा दावा केला. अमित शहा एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी 2029 मध्ये महाराष्ट्रात एकटय़ा भाजपचे सरकार आणायचे, असा स्वबळाचा सूर आळवला. यामुळे मिंधे गट आणि अजित पवार गटाची हवा टाईट झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे नेते अमित शहा मुंबई आणि कोणातील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शहा यांनी जे सरकार काम करते ते निवडणुका जिंकते. त्यामुळेच आपण केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आलो आहोत. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात आपलेच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सत्ता आल्यास समान नागरी कायद करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असा दावा केला.

राज्यात एका पक्षाचे सरकार येऊच शकत नाही

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात 1985 नंतर जवळपास 40 वर्षे एका पक्षाचे सरकार कधीच आले नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या परिस्थितीत राज्यात एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने अमित शहा बोलले असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.