गिरे तो भी… आमचा पराभव नाहीच; भाजप अध्यक्षांची दर्पोक्ती

15

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आमचा पराभव झालाच नाही, अशी दर्पोक्ती केली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला नसून विरोधकांचा विजय झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश न होता अधिक जोमाने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. तीन राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ते बोलत होते. मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे मतदान 10.30 पूर्वी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आमच्या विरोधकांचा विजय झाला आहे. मात्र, आमचा पराभव झालेला नाही. निवडणुकांचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. मात्र, या राज्यांमध्ये आमचा जनाधार कायम आहे. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही. कार्यकर्त्यांनी निराश न होता अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. विरोधकांनी जातीयवाद, वंशवाद आणि तृष्टीकरणाचा कर्करोग निर्माण केला आहे. तो रोखण्याचे महत्त्वाचे काम आपल्याला करायचे आहे, असे ते म्हणाले. विरोधकांनी लोकशाही व्यवस्था कमकुवत केली आहे. ती आपल्याला सक्षम करायची आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आपली प्रतिक्रिया द्या