बॅक टू वर्क! निर्बंध शिथिल झाल्यानंतर अमिताभ बच्चन परतले सेटवर

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे राज्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी घातली होती. रुग्ण संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या ब्रेकनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. पुन्हा सेटवर परतल्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘‘सकाळचे सात वाजलेत… कामावर चाललोय… लॉकडाऊन 2.0नंतर शूटिंगचा पहिला दिवस… पेंगोलीन मास्कसोबत. आजूबाजूच्या परिस्थितीत सुधारणा होतेय. दिवसेंदिवस त्यात आणखी सुधारणा होत जाईल.’’ अलिकडेच बिग बी यांनी ब्लॉग लिहिला होता. त्यात आपण लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रॉडक्शन हाऊसद्वारे ‘गुडबाय’च्या संपूर्ण टीमचे लसीकरण करण्यात आले आहे. शक्य तितकी काळजी घेतली जातेय. सर्व कॅमेरे शॉर्ट ब्रेकनंतर सॅनिटाईज करण्यात येत आहेत. तसेच स्टुडिओच्या आत येण्यापूर्वी सर्वांची चाचणी करण्यात येतेय. ठराविक दिवसानंतर सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. ज्या व्यक्ती कोरोना संक्रमित आहेत, त्यांना स्टुडिओत येण्यासाठी बंदी घातली आहे, अशी माहिती त्यांनी ब्लॉगमध्ये दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या