नाइलाजाने शर्टाला गाठ बांधली अन् ती फॅशन झाली! बिग बी यांनी उलगडलं ‘दिवार’मधील लूकचं रहस्य

डेनिम ब्लू शर्ट, पुढच्या बाजूला शर्टाला बांधलेली गाठ अन् डाव्या खांद्यावर अडकवलेला दोरखंड असा ‘दीवार’ या सिनेमातील बिग बी यांचा लूक त्या वेळी गाजला. लोकांनी स्टाईल समजून त्यांचा हा लूक फॉलो केला. मात्र या सिनेमातील आपल्या लूकमागचं रहस्य नुकतंच बिग बी यांनी सोशल मीडियावरून उलगडलं आहे. खरंतर हा लूक स्टाईलचा भाग नव्हता तर टेलरची चूक लपवण्यासाठी लढवलेली शक्कल होती.

महानायक अमिताभ बच्चन बॉलिवूडच्या सर्वात बिझी कलाकारांपैकी एक आहे. तितकेच ते टेक्नोसॅव्हीदेखील आहेत. वेळात वेळ काढून ते आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच त्यांनी 1975 साली रिलीज झालेल्या ‘दीवार’मधील आपला जुना फोटो शेअर करत या सिनेमातील आपल्या लूकचे रहस्य शेअर केले आहे.

बिग बी म्हणाले, ‘‘ते दिवस काही वेगळेच होते मित्रांनो…आणि ते नॉटेड शर्ट. यामागे एक गोष्ट दडलेली आहे. शूटिंगचा पहिला दिवस होता… शॉट रेडी होता… कॅमेरा रोल होणार होता… तेव्हा अचानक लक्षात आलं शर्टाची लांबी जवळपास माझ्या गुडघ्यापर्यंत होती… दुसऱया शर्टाची वाट पाहण्यासाठी दिग्दर्शकाकडे अजिबात वेळ नव्हता. शेवटी शर्टाला गाठ बांधली आणि…’’

बिग बी यांची ही पोस्ट सर्वांच्या पसंतीस उतरत असून चाहत्यांपासून कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आम्ही सर्वांनी तुम्हाला कॉपी केलं’ असे कमेंटमध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हर याने म्हटले आहे. तर ‘…आणि इतिहास घडला’ अशी कमेंट अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या