‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली

150

सामना ऑनलाईन, मुंबई

यंदाच्या विश्वचषक अंतिम लढतीत यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील जोरदार झुंजीनंतरही चक्क सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. त्यामुळे या लढतीतील डावात आणि सुपर ओव्हरमधील 26 चौकारांच्या आधारावर यजमान इंग्लंडला ऐतिहासिक विजेतेपद बहाल करण्यात आले. बरोबरीची झुंज देऊनही डावात 17 चौकार लागवणारा न्यूझीलंड संघ विश्वचषक जेतेपदापासून वंचित राहिला.आयसीसीच्या या अजब निर्णयावर सर्वच थरातून जोरदार टीका होत आहे. बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनीही आयसीसीच्या या निर्णयाची सोशल साइटस्वर जोक शेअर करीत खिल्ली उडवली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमिताभ म्हणतात, तुमच्याकडे 2000 रुपये आहेत, माझ्याकडेही 2000 रुपये आहेत. तुमच्याकडे 2 हजारांची 1 नोट आहे तर माझ्याकडे 500 रुपयांच्या 4 नोटा आहेत. मग सांगा कोण जास्त श्रीमंत.? आयसीसी म्हणते, ज्याच्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत तो श्रीमंत. आयसीसीचा हा अजब नियम पाहून मला वाटते की, माझी आई नेहमी म्हणायची चौका बरतन आना चाहिये तेच खरे.

चौकारांवर विजेतेपद, पटत नाही

केवळ चौकार जास्त म्हणून टाय लढतीत एखाद्या संघाला क्रिकेटचे विश्वविजेतेपद बहाल करणे मला तरी पटत नाही. त्यामुळे माझ्या हृदयात विश्वविजेता संघ म्हणून न्यूझीलंडच्याच नावाची नोंद झाली आहे. अर्थात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उभय संघ खरेच छान खेळले. पण नियम अखेर नियम असतात हे मान्य करावेच लागेल, अशी भावना टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या