अमिताभ बच्चन जखमी; हैदराबादमध्ये सेटवर झाली दुखापत, हालचाल आणि श्वासोच्छवासास त्रास

बॉलिवूडचे शेहनशाह अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांना हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ च्या चित्रिकरणावेळी दुखापत झाली. त्यांच्या उजव्या बरगडीजवळी स्नायू फाटल्याचं वृत्त आहे. 80 वर्षीय अभिनेते बच्चन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये खुलासा केला की सेटवर त्यांनी अॅक्शन शॉट चित्रित केला आणि त्यांना दुखापत झाली. त्यांना हैदराबादमध्ये तातडीने वैद्यकीय सेवा मिळाली आणि आता ते मुंबईतील ‘जलसा’ येथे आराम घेत आहेत.

आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अत्यावश्यक कामांसाठी थोडा मोबाइलचा आधार घेत असून अन्य वेळ विश्रांतीच घेत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. ‘होय, वेदनादायक’, अशा शब्दात त्यांनी झालेल्या दुखापतीचे वर्णन केलं आहे. या दुखापतीमुळे आपल्याला हालचाल करण्यास तसेच श्वासोच्छवास करताना देखील थोडा त्रास होतो असेही त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. सर्व सुरळीत होण्यासाठी काही आठवडे लागतील, असंही ते म्हणतात. तसेच चाहत्यांनी जलसा येथे नेहमीप्रमाणे भेट घेण्यासाठी जमा होऊ नये अशी विनंती करत त्यांनी पोस्ट पूर्ण केली आहे.

त्यांच्या पोस्टमध्ये, अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के शूटच्या वेळी, अॅक्शन शॉट दरम्यान, मी जखमी झालो. उजव्या बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले. त्यामुळे शूट रद्द केले, डॉक्टरांच्या सल्ल्याने स्कॅन केले. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मी घरी परतलो. आता स्ट्रॅपिंग केले गेले आहे आणि काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. होय हे वेदनादायक. हालचाल आणि श्वासोच्छवासाला थोडा त्रास जाणवतो. सर्वकाही सामान्य होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदनांवर काही औषधे देखील सुरू आहेत’.

‘म्हणून जे काम करायचे होते ते सर्व थांबवले आहे आणि बरे होईपर्यंत सगळे रद्द करण्यात आले आहे’, असेही ते म्हणतात. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, ‘मी जलसा येथे विश्रांती घेतो आणि आवश्यक कामांसाठी मोबाइल वापरतो, मात्र अधिक करून विश्रांतीच घेत आहे’.

‘आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना भेटणं अशक्य वाटत आहे किंवा मी सांगू शकत नाही. त्यामुळे चाहत्यांनी इथे येऊ नये आणि ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना शक्य तितकी ही माहिती द्या. बाकी सर्व ठीक आहे’, असं म्हणत त्यांनी पोस्ट पूर्ण केली.

प्रोजेक्ट केमध्ये त्यांचे सह-कलाकार प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.