थंड तेलाच्या जाहिरातीमुळे ग्राहकाचे डोके तापले, अमिताभ यांना ग्राहक मंचाची नोटीस

129
सामना ऑनलाईन । जबलपूर
 नवरत्न ‘ठंडा-ठंडा, कूल-कूल’ या थंड तेलाच्या जाहिरातीमुळे एका ग्राहकाचं डोकं तापलंय. नवरत्नची ही जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत बिग बी अमिताभ बच्चन यांना ग्राहक मंचाने नोटीस पाठवली आहे. तेलाच्या जाहिरातीत अमिताभ म्हणतात की, हे तेल थंड थंड, कूल कूल आहे. पण यामध्ये कोणत्या औषधी घटकांचा किती प्रमाणात वापर करण्यात आलाय याबाबत ते काही माहिती देत नाहीत. हा मुद्दा उपस्थित करत जबलपूरचे रहिवासी पी.डी.बाखले यांनी याबाबत जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे.
 मध्य प्रदेशच्या जबलपूर ग्राहक मंचाने अमिताभ आणि नवरत्न तेल निर्माती कंपनी इमामी यांच्यावर ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप लावला आहे. ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली असून नवरत्न ‘ठंडा-ठंडा, कूल-कूल’ कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांना विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन अडचणीत येण्याची शक्यता आहे.अमिताभ बच्चन यांची नवरत्न तेलाची जाहिरात ही दिशाभूल करणारी आहे असं ही बाखले यांनी म्हटलं आहे. तसेच हे तेल नोंदणीकृत नाही किंवा या तेलाच्या निर्मितीचा परवानाही नाही. तरी देखील जाहिरातीत डोकेदुखी, शरीराच्या वेदनांपासून मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं, त्यामुळे हे तेल आहे की औषध असा प्रश्न पडतो” असं ते म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२ नुसार हे कायद्याचं उल्लंघन आहे, असे सांगत बाखले यांनी शारीरिक आणि मानसिक त्रासासाठी १५ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या