‘मी पाळणार जनता कर्फ्यू’, बिग बींकडून ट्वीट करत समर्थन

835

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने हिंदुस्थानातही हातपाय पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू असल्याचे जाहीर केले होते. या जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बिग बी अमिताभ बच्चन यांनीही जनता कर्फ्यूचे समर्थन केले आहे.

शुक्रवारी एक ट्वीट करून बिग बींनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, मी जनता कर्फ्युचे समर्थन करतो. 22 मार्च रोजी, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत. अशा परिस्थितीत देशवासियांच्या सेवेसाठी खंबीर आणि अविरत कार्य करत राहणाऱ्या सेवाव्रतींचं कौतुक आणि अभिनंदन, असं बिग बी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

‘कोरोना’चे संकट साधेसुधे नाही. यावर आतापर्यंत कोणतीही लस नाही. हे संकट खूप मोठे आणि वैश्विक आहे. त्यामुळे जनतेने संकल्प आणि संयम ठेवायला हवा. येत्या रविवारी (दि. 22) ‘जनता कर्फ्यू’ देशभर लागू होईल. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱया सूचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही आवाहन केले आहे. 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ हा आत्मसंयम देशहितासाठी कर्तव्य पालनाचे प्रतिक असेल. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या