शिवसेनाप्रमुखांनी माँ जिजाऊ व शिवरायांचे कार्य जनतेपर्यंत पोहचवले: अमोल कोल्हे

138

सामना प्रतिनिधी । मातृतिर्थ सिंदखेडराजा

जिजाऊ माँ साहेबांचे, शिवाजी महाराजांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवून या दोन्ही देवतूल्य व्यक्तीमत्वांना मोठे करण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. जिजाऊ, शिवाजी महाराजांच्या भगवी पताका आसमंतात सदैव फडकत राहू दे असे प्रतिपादन अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. जिजाउ माँ साहेबांच्या ४२१ व्या जयंतीनिमीत्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. अमोल कोल्हे यांना मराठा विश्वभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, बॅडमिंटनपटू प्राजक्ता संजय सावंत, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोतम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विय घोगरे, महासचिव इंजि. मधुकराव मेहेकरे, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, राजश्री जाधव सपत्नीक, शिवसेना मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांची उपस्थिती होती.

कोल्हे म्हणाले की, “राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याला नितिमत्ता, संस्कार, नैतिक अधिष्ठान दिले. ज्यामुळे परस्त्री मातेहून सुंदर वाटू लागली. परस्त्रीला माता मानन्याची भावना जागू लागली ती जिजाऊंच्या शिकवणीमुळेच.” फक्त १२ जानेवारीला जिजाऊंचा जयजयकार करत असाल तर मातृतिथार्वर येऊ नका असे सांगत वर्षातील ३६४ दिवस घरातील जिजाऊचा सन्मान करा असे भावनिक आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

“स्वराज्याचे तीन कोण जोडणारी एक समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आहे. स्वराज्य संकल्पासोबत शहाजी महाराजांसोबत नाव जोडले जाते. तेव्हा त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतिक माँ जिजाउंना म्हटल्या जाते. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांसोबत जिजाऊंचे नाव जोडले जाते, तेव्हा अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून जिजाऊंची नाव घेतले जाते आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी राजेंबाबत जिजाऊंचे नाव समोर येते तेव्हा आदर्शाची वाट दाखवणार्‍या आजीचा उल्लेख आदराने केला जातो. जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, पण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांचे नाव घेतले तर आजही साडेतीनशे वर्षाननंतर सुध्दा मान आदराने झुकते. ती जिजाऊंनी दिलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे.” मालिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिष्टा जागवण्याचे काम करीत असलो तरी प्रत्यक्षात हा विचार स्वतःच्या आचरणात रूजवून साक्षात मृत्यूशी लढणारे मराठा विश्वभूषण लेफ्ननंट जनरल राजेंद्र निंबोळकर यांचे कार्य महान असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

राष्ट्रमाता जिजाऊ संभाजी राजे, शिवाजी राजे, संभाजी राजे हे तीन कोण जुळणारी कोणशिला आहे. मराठा या शब्दावर जेव्हा विलांटी कधी लागते तेव्हा मराठी कधी होतो याची कल्पना येत नाही. जिजाऊंनी नेमका कुठला संस्कार शिवाजी महाराजांना दिला तो म्हणजे नैतिक अधिष्ठाण. राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याला नितिमत्ता दिली. कोणत्या जातीत, कोणत्या प्रांतात जन्माला आलो हे मानणे हा अहंकार आहे. त्यामुळे न्युनगंड न बाळगता आपल्या कर्त्तुत्वाने प्रांताचे, जातीचे व राष्ट्राचे नाव व्यक्तिमत्वाच्या उंचीवर नेवून ठेवावे असे आवाहनही कोल्हे यांनी जिजाउ प्रेमी युवकांना यावेळी केले.

शिक्षकाने तयार केलेली संभाजी महाराजाची प्रतिमा डॉ अमोल कोल्हेंना भेट

अंत्री देशमुख  येथील  शिक्षक दत्तात्रय  चांगाडे यांनी तयार केलेली छत्रपती संभाजीमहाराज यांची आकर्षक प्रतिमा आज सिंदखेडराजा येथे मराठा विश्वभूषण पूरस्कार प्राप्त डॉ अमोल कोल्हे यांना त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत साकारलेले छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिमा शिवरायांचे वंशज  संभाजीराजे भोसले यांचे हस्ते देण्यात आली.  मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील शिक्षक दत्तात्रय चांगाडे हे चित्रकार असून त्यांनी  स्वतः रेखाटलेली छत्रपती संभाजीमहाराज यांची प्रतिमा डॉ अमोल कोल्हे यांना भेट देण्यासाठी ते सिंदखेडराजा येथे गेले होते.

sambhaji-painting

आपली प्रतिक्रिया द्या