
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सत्तासंघर्षावरील सुनावणी नुकतीच संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. मार्च महिन्याअखेरीस याचा निकाल येण्याची शक्यता घटना तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातील अनेक प्रश्नांना शिंदे गटाच्या वकिलांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागेल, असा तर्क लावला जात आहे. तर दुसरीकडे निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वास शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं आहे.
कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, तर या सरकारचे बारा वाजणार,हे निश्चित आहे. त्यामुळेच ‘ईडी पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ हा आमच्या आंदोलनाचा नारा होता. राज्यात आता बळीचं राज्य यायला सुरुवात होईल, असे अमोल मिटकरी म्हणाले. सत्ताधीश हे मदमस्त झाले आहेत. पण अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर हे सरकार अपात्र ठरले. त्यामुळेच हे सरकार अल्पावधीचं सरकार आहे, असे मिटकरी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा शिंदे गटाला विश्वास आहे, याबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले की, विश्वास ठेवायला हरकत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेच्या बाहेर जाता येत नाही. न्यायालयाला राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागतो. निकाल त्यांच्या बाजुने लागणार असा त्यांना विश्वास असेल तर मग त्यांच्यामध्ये अस्वस्थता का आहे? मंत्रालयातील फाईलींच्या हालचालींना वेग का आलाय? देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसतेय, ही कशाची चिन्हं आहेत, असे सवालही त्यांनी केले. आम्ही अस्वस्थ झालेलो नाहीत. आम्हाला विश्वास आहे. न्यायदेवता अजून जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालय घटनेला छेदून पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असेही मिटकरी म्हणाले.