अमरावतीच्या रोप वाटिकेतील बांबू वाढविणार राजभवनाची शान

सामना ऑनलाईन । अमरावती

वन विभाग लोक सहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात वनमहोत्सव साजरा करणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मुंबई येथील राजभवनातही राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डन मधून बांबूची विविध प्रजातींची १२५ रोपं मुंबईला पाठविण्यात आली आहेत.

राज्यातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बांबू रोपवाटिका म्हणून अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डनचा उल्लेख केला जातो. या बांबू गार्डन मध्ये देश विदेशातील तब्बल ६३ प्रजातींच्या बांबूंची रोपं उपलब्ध आहेत. मुंबईच्या राजभवनात याच रोप वाटिकेतील २५ प्रजातींच्या बांबूंची १२५ रोपं वृक्ष लागवडीकरिता पाठविण्यात आली आहेत.

यामध्ये खाण्यायोग्य बांबू , बासरीसाठी वापरण्यात येणारा बांबू, पिवळा बांबू, ग्रीन बांबू याशिवाय त्रिपुरा येथील फिशरी रॉड बांबू व कॅनडा येथील सशा फालकूनी या प्रजातींच्या बांबूंची रोप १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाकरिता मुंबई कडे रवाना करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपर्यात अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डनमधून बांबूची रोपं वितरित करण्यात येत असतात. मात्र आता ही रोपं थेट मुंबईच्या राजभवनात जात असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया वनपाल शेख सलीम यांनी दिली.