700 कोटींच्या गुंतवणुकीसाठी दलाली घेतली, अमरावती जिल्हा बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती जिल्हा सहकारी बँकेने एका खाजगी कंपनीत 700 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरसह बँकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून सुमारे 3 कोटी 39 लाख रुपयांची दलाली खाल्ली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी अधिकारी, कर्मचारी व मध्यस्थ दलालांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ते बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

प्रकरण नेमके काय आहे ?

अमरावती जिल्हा बँकेने 2013 ते 2019 या काळात निप्पॉन कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. म्युच्युअल फंडातील या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणं अपेक्षित असल्याचे सांगत हे पैसे गुंतवण्यात आले होते. हा व्यवहार बँक आणि निप्पॉन कंपनी यांच्यामध्ये थेट पद्धतीने झाला होता. मात्र या व्यवहारासाठी 3 कोटी 39 लाख रुपयांची दलाली देण्यात आली. जर व्यवहार थेट झाला असेल तर मग दलाली कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

गुंतवणूक समितीवर प्रश्नचिन्ह

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी हे ठरवण्यासाठी बँकेची एक गुंतवणूक समिती आहे. 700 कोटींची ही गुंतवणूक होत असताना ही गुंतवणूक समिती काय करत होती? तिला या गुंतवणुकीबाबत माहिती होती अथवा नाही? जर माहिती होती तर मग दलाली द्यायचे कोणी आणि का ठरवले ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ 18 फेब्रुवारी 2021 मध्ये बरखास्त झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी या गुंतवणुकीत काहीतरी काळेबेरं असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी बँकेचे प्रशासक सतीश भोसले यांच्याकडे माहिती मागितली होती. यानंतर भोसले यांनी बँकेचे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. ऑडीट रिपोर्टमध्ये 3 कोटी 39 लाख रुपये दलाली दिल्याचा उल्लेख आहे.

पोलिसांनी कार्यकारी संचालक, कर्मचारी आणि या व्यवहारासाठी दलाली करणाऱ्या ब्रोकरविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ऑडीट रिपोर्ट मिळाल्यानंतर हे प्रकरण आर्थिक स्वरुपाचे असल्याने गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपायुक्त या प्रकरणाचा तपास करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या