दुर्देवी घटना! ड्युटीवरुन परतताना आठ महिन्याच्या गर्भवती पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

अमरावती येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. ड्युटीवरुन परतत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही महिला पोलीस कर्मचारी आठ महिन्यांची गर्भवती होती. याप्रकरणी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. या घटनेने पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.

प्रियंका शिरसाट असे मृत पोलीस महिलेचे नाव असून त्या आठ महिन्याच्या गर्भवती होत्या. प्रियंका शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ड्युटी संपवून पती सागर शिरसाट यांच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. दुचाकी गाडगे नगर मंदिरापासून काही अंतरावर असताना पाठिमागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, या अपघातात प्रियंका आणि त्यांचे पती खाली पडले. यामध्ये प्रियंका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर गर्भातील बाळ पण मरण पावले. त्यांच्या पतीवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे.