अमरावतीत हवालाचे सव्वा तीन कोटी जप्त, सहा जणांना अटक

अमरावतीत राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या फरशी स्टॉप जवळ राजापेठ पोलिसांनी धाड टाकून गाडीतून सुमारे सव्वा तीन कोटी रुपये जप्त केले आहेत. यासंदर्भात नोटा मोजण्याचे काम सध्या राजापेठ पोलीस ठाण्यात सुरु आहे.

हवालाची रक्कम घेऊन काही जण अमरावती येथे येत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजापेठचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे आपल्या ताफ्यासह काल रात्री पासूनच लक्ष देऊन होते. त्यानुसार आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास 2 स्कॉर्पिओ गाड्या दस्तुरनगर जवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये पोहचल्या. सुरुवातीपासूनच पोलीस लक्ष देऊन असल्यामुळे त्यांनी लगेच अपार्टमेंटवर छापा टाकला. घटनास्थळी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपीगुजरातचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली.

दोन्ही गाडींची पोलिसांनी झडती घेतली असता गाडीत तीन कोटी 25 लाख रुपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी ही सर्व रक्कम ताब्यात घेतली आहे. ही कारवाई आज दुपारी सुरु असतांनाच कोषागार व आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना  पोलीस स्थानकात बोलविण्यात आले आहे. सध्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, उपायुक्त सातव राजापेठ ठाण्यात बसले असून अधिक तपास निरीक्षक मनीष ठाकरे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या