
त्रिपुऱ्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चांना अमरावती, नांदेड आणि मालेगाव इथे हिंसक वळण लागले होते. या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. अमरावतीमध्ये भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला होता. यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी संघटनांचे अमरावतीमधील राजकमल चौकात जमले होते. यानंतर निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने अमरावती शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळपासूनच राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने नागरीक जमले होते. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान दुर्गा हॉटेलजवळ असलेल्या पानठेल्याची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. राजकमल चौकाच्या शेजारी नमुना परिसर मुस्लिमबहुल वस्ती आहे. या परिसरात एक मशिद असून त्यावरही मोर्चेकरी चाल करून जातील अशी भीती वर्तवण्यात येत होती. यामुळे पोलिसांनी मशिदीवरील झेंडा काढून तिला संरक्षण दिले. दुसरीकडे अमरावती शहराच्या विविध भागात जमावाने जाळपोळीचं सत्र सुरू केलं. वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केली,ज्यामुळे दुपारी दोननंतर शहरातील वातावरणावरण थोडे निवळण्यास मदत झाली.
अमरावती शहरात चार दिवस संचारबंदी
सलग दोन दिवस झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी चार दिवसांकरिता संचारबंदी लावली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह सध्या सुट्टीवर असून त्यांना तातडीने रूजू होण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार आरती सिंह आज सकाळीच जयपूर येथून रवाना झाल्या आहेत. तत्पूर्वी त्यांच्याच आदेशानुसार अमरावती आयुक्तालयाच्या हद्दीत चार दिवस संचारबंदी लावली आहे. यासोबतच शहरात एसआरपीच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांना अमरावती शहरात बोलविण्यात आले आहे.