शिरीष कणेकर म्हणजे आनंदाची साखर वाटणारा माणूस!

सामना प्रतिनिधी । मुंबई

बाहेर धो धो पाऊस कोसळत होता, तर आत रवींद्र नाटय़मंदिरात कणेकरप्रेमींच्या उत्साहाला पूर आला होता. अर्थात निमित्तही तसेच होते. गेली ५० वर्षे कधी पत्रकाराच्या भूमिकेतून तर नंतरच्या काळात एक चतुरस्र लेखक, कलावंत म्हणून हजारो रसिकांची शिदोरी पाठीवर मारून सातासमुद्रापार जाणारे शिरीष कणेकर यांचा अमृतमहोत्सव सोहळा आज अत्यंत दिमाखात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर ‘कणेकर म्हणजे आनंदाची साखर वाटणारा माणूस आहे’ असा गौरव करत कणेकर वयाच्या शंभरीपर्यंत अशीच फटकेबाजी करतील आणि आपल्या लेखणीने सर्वांना तरुण ठेवतील अशा शुभेच्छा त्यांना दिल्या.

दै. ‘सामना’ने कणेकरांची पंच्याहत्तरी साजरी करायचे ठरवले तेव्हाच हा कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. कणेकरांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, दगदग, धावपळीच्या यंत्रवत झालेल्या या जीवनात आनंदाच्या वंगणाची आवश्यकता असते. ते आनंदाचे वंगण टाकणारे शिरीष कणेकर आहेत. गेली ५० वर्षे लिखाण आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्लमबाजी, फटकेबाजी करणारे कणेकर हे खऱया अर्थाने बाजीराव आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘जगायचं असेल तर काही पैशांचा पाव घ्या, आणि उरलेल्या पैशांचं फूल घ्या’ अशा आशयाची एक चिनी म्हण आहे. कारण पाव हा तुम्हाला जगवतो, तर फूल हे कसं जगावं हे शिकवते. पण मी तर असं म्हणेन की एका पैशाचा पाव घ्या आणि दुसऱया पैशाचं कणेकरांचं पुस्तक घ्या. कारण फूल कोमेजू शकतं, पण कणेकरांचं लिखाण कधीही कोमेजू शकत नाही. (प्रचंड टाळय़ा).

काही माणसं आपल्या आयुष्यावर नुसताच प्रभाव टाकत नाहीत तर ती आपल्या आयुष्यात झिरपतात. शिरीष कणेकर माझ्या आयुष्यात असाच झिरपला आहे, असे नाना पाटेकर म्हणाले.

किस्से आणि हास्याचे फुलबाजे
शिरीष कणेकर यांच्या एकपात्री प्रयोगात त्यांच्या भन्नाट किश्शांवर हसताना रसिक प्रेक्षक अक्षरशŠ गडागडा लोळायला लागतात. आजही त्यांनी त्यांची अशीच तुफान फटकेबाजी केली.

… आणि कणेकरांनी माईक हातात घेतला
-एकदा मी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले, माझा एकटय़ाचा जन्म पुण्याचा. मीदेखील पटकन अनवधानाने म्हटले, माझाही जन्म पुण्याचाच. तेव्हा त्यांनी चष्म्याआडून माझ्या दिशेने भेदक कटाक्ष टाकून केवळ एकच शब्द उच्चारला, तरीच…. आता तरीच या शब्दाचा अर्थ विचारायला काही मी धजावलो नाही. (हंशा)
-एकदा हेमामालिनी बाळासाहेबांकडे आली होती. कुठल्या तरी निर्मात्याने तिचे पैसे थकवले होते. बाळासाहेबांनी तिला तिचे पैसे मिळवून दिले. त्याबद्दल ती त्यांचे आभार मानायला आईला घेऊन आली होती. आभार मानल्यानंतर ती परत निघाली. दारापर्यंत जाताच बाळासाहेबांनी तिला विचारले, ‘हेमा, धर्मेंद्र अभी भी मारता है क्या?’ काय लोडेड प्रश्न आहे बघा… (हंशा). आता यावर नाही म्हटले तर त्याचा अर्थ पहेले मारता था असा होईल आणि तुम्ही हो म्हणाला तर अजून चालूच आहे मारझोड. (प्रचंड हंशा). ती काहीतरी पुटपुटली तेव्हा तिच्या चेहऱयावरचा रंग उडाला होता. ती अभिनयच विसरून गेली होती.
-एकदा मला माझ्या नातवाने मला विचारले, ‘आर यू सेलिब्रेटी?’ साहजिकच आहे. हा ढेरपोटय़ा चट्टेरीपट्टेरी चड्डी घालून उघडाबंब सबंध घरात फिरत असेल आणि तो मला पाहत असेल तेव्हा त्याच्या मनात हा प्रश्न येणारच. त्याहूनही भयानक पुढचा प्रश्न त्याने विचारला की, ‘आर यू क्रिमिनल?’ कारण सेलिब्रिटी किंवा क्रिमिनल या दोघांचेच फोटो छापून येऊ शकतात असा माझ्या नातवाचा समज होता. (हंशा).

कणेकरांच्या खिशातील पेनाची ‘ताकद’
या सोहळय़ात कणेकरांची ग्रंथतुला करण्यात आली. एका पारडय़ात कणेकर आणि दुसऱया पारडय़ात कणेकरांच्या वजनाएवढी पुस्तके. त्या प्रसंगाची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, ग्रंथतुला सुरू होती; मात्र पुस्तके आणि कणेकर यांचे वजन काही समसमान होत नव्हते. मी म्हटले, कणेकरांच्या खिशातील ‘ते’ पेन जरा काढा बघू. झालेही तसेच. पेन बाजूला काढताच तुलाभार समसमान झाला. कणेकरांच्या पेनाची ती ताकद होती. (टाळय़ा). मला ते बरोबर समजलं, कारण मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे. (हंशा).

कणेकर मनाने म्हातारे होऊ नका, तुमचे लेखन अजूनही ताजेतवाने!
कणेकर मनाने कधीच म्हातारे होऊ नका! तुमचे लेखन आजही ताजेतवानेच, तरुण आहे. ही तुमच्यातल्या रसिकतेची पंच्याहत्तरी आहे. स्वत:ला कधीच म्हातारे समजू नका. तुमच्या शंभरीचा कार्यक्रमही असाच जमून येईल अशा शुभेच्छा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्या. कणेकरांनी लता मंगेशकर, दिलीपकुमार, बाळासाहेब ठाकरे ही नावे सोडून कुणावरही प्रेम केले नाही. त्याहूनही सर्वात जास्त प्रेम त्यांनी स्वत:वर केले, स्वत:च्या लिखाणावर केले. त्यामुळेच तुमचे लिखाण अजूनही ताजेतवानेच वाटते असे संजय राऊत म्हणाले.

शिरीष कणेकर यांच्या पत्नीचा विशेष सत्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे तसेच कणेकर कुटुंबीय उपस्थित होते.

आई, वडील आणि पत्नी
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, अतुल परचुरे आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शिरीष कणेकर यांच्या पुस्तकातील उताऱयांचे अभिवाचन केले. या अभिवाचनातून बालपणीच आई हरपल्याचे कणेकरांचे दुŠख आणि वडिलांनी त्यांच्यासाठी केलेले कष्ट तर पत्नीसोबतच्या आयुष्यातील मिष्कील प्रसंग उलगडले.

या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सांस्कृतिक कार्यसंचालक संजीव पालांडे, नेपथ्यकार बाबा पार्सेकर, कौटिल्य ऍडव्हर्टायझिंगचे मनोज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटय़निर्माते अजित भुरे यांनी केले.शिरीष कणेकर यांच्या ‘यार दोस्त’ या ४४ व्या पुस्तकाचे ‘आंबट चिंबट’, ‘एक्केचाळीस’ या पुनर्मुद्रित पुस्तकांचे प्रकाशनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या