अमृतपालची पत्नी ‘बब्बर खालसा’ची सदस्य! खलिस्तानसाठी परदेशातून पैसा जमवते 

पंजाब पोलिसांना चुना लावून पसार झालेला खलिस्तानवादी अमृतपालची पत्नी किरणदीप ही कट्टर खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसाची सदस्य असून, तिने संघटनेसाठी परदेशातून प्रचंड पैसा गोळा केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये तिच्यासह पाच जणांना बब्बर खालसासाठी पैसा गोळा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

कारवाईचा फास आवळताच गुंगारा देऊन पसार झालेल्या खलिस्तानवादी अमृतपालच्या शोधासाठी पंजाब पोलिसांनी आकाश-पाताळ एक केले आहे. अजनाला येथून चारचाकीत पळालेल्या अमृतपालने नांगल आंबिया येथे गुरुद्वारात संपूर्ण पेहराव बदलला. कृपाणही त्याने तेथेच टाकून दिले. पँट-शर्ट घालून तसेच केस कापून तो मोटारसायकलवरून पुढे पळाला. पोलिसांनी त्याची चारचाकी तसेच मोटारसायकलही जप्त केल्या. अमृतपालच्या कारमधून पोलिसांनी शस्त्र्ासाठाही जप्त केला. अमृतपालच्या शोधासाठी त्याच्या कुटुंबाकडे चौकशी करण्यात येत आहे.

 किरणदीप कौर बब्बर खालसाची कार्यकर्ती

अमृतपालची पत्नी किरणदीप कौर ही परदेशस्थ हिंदुस्थानी आहे. बब्बर खालसा संघटनेची ती कार्यकर्ती असून खलिस्तानसाठी परदेशातून तिने मोठय़ा प्रमाणावर पैसा गोळा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अतिरेकी संघटनेसाठी निधी गोळा करण्याच्या आरोपावरून तिच्यासह पाच जणांना 2020 मध्ये अटक करण्यात आली होती.

 गुरुद्वाराच्या ग्रंथींना शस्त्राचा धाक

नांगल आंबिया येथे अमृतपालने गुरुद्वाराच्या ग्रंथींना शस्त्र्ााचा धाक दाखविला. मुलाच्या सोयरिकीसाठी आमच्याकडे पाहुणे येणार होते, असे ग्रंथींच्या पत्नी नरिंदर काwर यांनी सांगितले. मात्र, अमृतपाल व त्याच्या सहकाऱयांनी बंदुकीचा धाक दाखविला. आम्ही पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण त्यांनीच खाल्ले. कपडे घेऊन गेले, असे त्या म्हणाल्या.

 एनआयएच्या निशाण्यावर 500 लोक

‘एनआयए’ने अमृतपालच्या संबंधातील जवळपास 500 लोकांची यादी तयार केली आहे. तीन श्रेणीत हे लोक विभागण्यात आले आहेत. पहिल्या श्रेणीत 142 जण असून ते 24 तास अमृतपालसोबत असायचे. दुसऱया श्रेणीत 213 जण असून ते अर्थव्यवहार पाहतात. या यादीत अमृतपालची पत्नी किरणदीपचाही समावेश आहे. तिसऱया यादीत अमृतपालच्या कट्टर समर्थकांचा समावेश आहे.