अमूल कंपनीची ‘मिल्क ट्रेन’ गुजरातहून दिल्लीला रवाना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील प्रसिद्ध दूध कंपनी ‘अमूल’ची पहिली ‘मिल्क ट्रेन’ गुजरातहून दिल्लीला रवाना झाली आहे. विशेष म्हणजे या गाडीशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय ट्विटरवरुन एकमेकांना ट्वीट करत अमूल कंपनी आणि रेल्वेचे अधिकारी यांनी घेतले आहेत. या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा व्यावसायिक करार शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने दाखवून दिले.

अमूल कंपनीने अमूल बटर देशभर पाठवण्यासाठी रेफ्रिजरेशन करण्याच्या व्यवस्थेसह मोठ्या वाहनाची आवश्यकता असल्याचे ट्वीट केले होते. याला प्रतिसाद देत रेल्वेने ‘टेस्ट ऑफ इंडियाला प्रत्येकापर्यंत पोहचवताना अटर्ली बटर्ली आनंद होईल’ असे ट्वीट केले होते. या घटनाक्रमानंतर अमूल कंपनीने एका विशेष मालगाडीतून १७० लाख टन अमूल बटर दिल्लीला रवाना केले. हे बटर गुजरातच्या पालनपूरहून निघाल्याचे अमूल कंपनीने जाहीर केले आहे.

मोठ्या प्रमाणावर बटर पाठवायचे असल्यामुळे मालगाडीच्या डब्यात रेफ्रिजरेशन (तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा) करण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. अमूलच्या मालगाडीतून येणाऱ्या बटरचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्वीट करुन जाहीर स्वागत केले आहे. तर अमूल कंपनीने रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाचे सहकार्यासाठी आभार व्यक्त केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या