उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना उघडकीस आली आहे. गीता जयंती एक्सप्रेसच्या आपत्कालीन खिडकीतून 8 वर्षाच्या चिमुरडी बाहेर पडल्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून 100 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून पडूनही चिमुकली चमत्कारीकरित्या बचावली.
काय आहे नेमके प्रकरण?
अरविंद तिवारी आपल्या कुटुंबासह नवरात्रीसाठी आपल्या मूळ गावी मध्य प्रदेशातील टीकमगढला गेले होते. अष्टमीची पूजा करून ते शुक्रवारी वृंदावन येथे परतत होते. यासाठी ते गीता जयंती एक्सप्रेसने मध्य प्रदेश ते मथुरा प्रवास करत होते. प्रवासात तिवारी यांची लहान मुलगी अंजली आपत्कालीन खिडकीजवळ बसली होती.
प्रवासादरम्यान ललितपूर स्थानकापासून 7 ते 8 किमी दूर अंतरावर आपत्कालीन खिडकीतून अंजली बाहेर पडली. ट्रेन 10-15 किमी दूर गेल्यानंतर वडिलांच्या मुलगी गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ ट्रेन रोखण्यात आली. ट्रेनमधीन उतरून मुलीचा शोध घेण्यात आला. यावेळी मुलगी जखमी अवस्थेत झाडीत सापडली. मुलीचा एक पाय तुटला होता. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रविवारी तिला घरी सोडले.