आठ वर्षाच्या मुलाचा गळफास बसून मृत्यू

49

सामना प्रतिनिधी । पिंपरी

दुसरीत शिकणारा अवघ्या आठ वर्षांचा मुलगा राहत्या घरात इलॅस्टिक पट्टीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही खळबळजनक घटना निगडीतील सिद्धिविनायकनगरीमध्ये सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. मुलाने गळफास घेतला की खेळताना चुकून त्याला गळफास बसला, याबाबत सांशकता आहे. चौकशीनंतरच यातील सत्य बाहेर येईल, असे देहूरोड पोलिसांनी सांगितले.

नकुल उल्हास कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. त्याची आई शिक्षिका असून, वडीलही नोकरी करतात. सोमवारी आई नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती, तर वडीलही कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी नकुल आपल्या १५ वर्षीय बहिणीसोबत घरात खेळत होता. खेळल्यानंतर तो आतील खोलीत गेला. खोलीचा दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ तो बाहेर आला नाही. काही वेळाने आई घरी आली. तिने दरवाजा वाजवला असता आतून काही प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी नकुल डोक्याला लावायच्या इलॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला त्वरित आकुर्डीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नकुल खेळत असताना आतील खोलीत गेला असावा. दिवाणावर ठेवलेल्या कपड्यांवर चढून इलॅस्टिक पट्टीने खेळत असताना कपड्यावरून पाय निसटून त्याला गळफास बसला असावा, अशी शक्यता व्यक्त केली.

मुंजीची तयारी अन् शोककळा
नकुलची ५ मे रोजी मुंज होती. यासाठी कुटुंबीयांची तयारी सुरू होती. नातलगांना निमंत्रण देणे सुरू होते. मात्र, अवघ्या बारा दिवसांवर मुंज आलेली असताना नकुलचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुलकर्णी कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.

आपली प्रतिक्रिया द्या